मालेगाव : शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी रविवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांविषयी शासन सकारात्मक असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.मानधनवाढ, विमा संरक्षण, कायमस्वरूपी नोकरी, वर्षाला दोन साड्या देण्यात याव्यात, आदी मागण्यांसाठी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा काही दिवसांपासून शासन दरबारी लढा सुरू आहे. त्याअंतर्गत आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आयटक आणि श्रमिक कामगार संघटना यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

प्रारंभी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाकडे मोर्चेकरी निघाले असता भुसे हे संपर्क कार्यालयात पोहोचत असल्याने तसेच पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मोर्चा संपर्क कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी भुसे यांनी महिलांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मानधन वाढीसह अन्य मागण्यांचा विषय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे यापूर्वीच आपण मांडला असल्याचे भुसे यांनी नमूद केले. चर्चेत हिम्मत गवळी, संगीता सोनवणे, संजय जमदाडे यांसह इतरांनी सहभाग घेतला.