नाशिक : रामसर स्थळाचा दर्जा मिळालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दाखल होण्यास सुरुवात होते. आणि संपूर्ण परिसर त्यांच्या किलबिलाटाने गाजतो. सध्या सुरू असलेल्या ‘पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी प्रगणना हा उपक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये विविध प्रकारच्या १२ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद झाली. पक्ष्यांची वाढती संख्या पर्यटकांना खुणावत आहे.

नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. या ठिकाणी नांदुरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा असल्याने या ठिकाणी पक्ष्यांसाठी विपूल स्वरुपात खाद्य मिळते. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले रामसर घोषित पक्षी अभयारण्य असून, येथे जलाशय, पाणथळ प्रदेश व गवताळ परिसर पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास निर्माण करतात. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण एक सुरक्षित विश्रांतीस्थान ठरते. वन विभागाच्या माहितीनुसार, थंडीची चाहूल लागल्याने येत्या काही दिवसांत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर भारत, तसेच सायबेरिया आणि मध्य आशियातून येणारे पक्षी लवकरच या परिसरात दाखल होतील. पक्ष्यांच्या प्रगणनेद्वारे केवळ संख्येचा अंदाजच नव्हे, तर त्यांची निवास पद्धती, खाद्यसाखळी व पर्यावरणीय संतुलनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या या उपक्रमातून स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ होत आहे.

सध्या अभयारण्यात पक्षी सप्ताह सुरू आहे. उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी प्रगणना राबविण्यात आली. चापडगाव संकुल, खानगव थडी आणि आजूबाजूच्या परिसरात वनकर्मचारी, पक्षी अभ्यासक आणि स्थानिक पक्षीप्रेमींनी मिळून सकाळच्या वेळेत निरीक्षण केले. या प्रगणनेत १२ हजार पाणपक्षी आणि ५,५०० गवताळ पक्ष्यांची नोंद झाली. यामध्ये ब्राह्मणी बदक, थापाड्या बदक, भुवई बदक, तलवार बदक, मोठा ठिपकेदार गरुड, दलदल ससाणा, लाल डोक्याचा चाराटी, पांढरा शराटी, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, कॉमन क्रेन, जांभळी पानकोंबडी, चमचा, कमळ पक्षी, लाल मुनिया, हळदीकुंकू, जांभळा बगळा, राखी बगळा आणि तरंग अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या उपक्रमात वनपाल रुपेश दुसाने, वनरक्षक गोरख पाटील, के. डी. सदगीर, तसेच स्थानिक कर्मचारी गंगाधर आगाव, अमोल दराडे, विकास गारे, रोशन पोटे, रोहित मोगल, पंकज चव्हाण आणि संजय गायकवाड यांनी सहभाग नोंदवला.

नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था विश्रामगृह, तंबु या ठिकाणी करण्यात आली आहे. याशिवाय अभयारण्यातील पक्षी पाहण्यासाठी दुर्बिणसह मार्गदर्शक, पक्ष्यांची माहिती मिळविण्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.