नाशिक : भारतात आल्यानंतर अवघ्या चार वर्षांत लाखो अनुयायी. यू टय़ूबवर वाहिनी. दिमतीला एक्सयूव्ही ५०० आणि फॉच्युनरसारख्या आलिशान मोटारी. विशिष्ट ठेवणीचा पेहराव. गळय़ात फुलांच्या माळा, गाण्यावर ठेका धरण्यापासून ते भक्तांकडून फुलांसह पैशांनी होणाऱ्या स्वागतापर्यंतचा अनुभव घेणारे अफगाणी सुफी प्रचारक अहमद झरीफ चिस्ती यांच्या हत्येनंतर त्यांनी अल्पावधीत कमावलेली कोटय़वधींची माया चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झरीफ बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिस्ती यांची येवल्यातील औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सायंकाळी गोळी झाडून हत्या झाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात उघड होणाऱ्या बाबींनी यंत्रणाही चकित झाली. झरीफ बाबा हे मूळचे अफगाणिस्तानचे. निर्वासित म्हणून त्यांना भारतात राहण्यास परवानगी मिळाली. खरे तर निर्वासितांचे जिणे अतिशय खडतर असते. त्यांना केवळ अन्नधान्य वा जगण्यासाठी आवश्यक बाबींपुरतीच परवानगी मिळते. मालमत्ता, वाहने खरेदीवर निर्बंध असतात. पण, अन्य निर्वासित आणि झरीब बाबा यांच्यात जमीन-आसमानचा फरक असल्याचे तपासातून समोर आले.

झरीफ बाबांनी दिल्ली, कर्नाटक येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते दीड वर्षांपूर्वी नाशिकला आले. सिन्नर तालुक्यातील वावी येथे ते वास्तव्यास होते. सर्वधर्मात त्यांचे अनुयायी होते. समाज माध्यमात ते चांगलेच सक्रिय होते. देशात कुठल्याही भागात भेट दिल्यानंतर भक्तांकडून उत्स्फूर्तपणे केल्या जाणाऱ्या स्वागताचे अनेक व्हिडीओ यू टय़ूब आढळतात. त्यांचे फुलांसह पैशांची बरसात करीत स्वागत व्हायचे. अगदी गरिबापासून ते बडी राजकीय मंडळी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी धडपड करायची. वैशिष्टय़पूर्ण धाटणीच्या पेहरावात ते वावरायचे. आलिशान मोटारीतून मार्गक्रमण करायचे. त्यांच्याकडे एक्सयूव्ही ५०० आणि फॉच्युनरसारखी वाहने होती. भारतात मालमत्ता आणि वाहन खरेदी करता येत नसल्याने त्यांनी त्यावर तोडगा शोधला. आपल्या निकटवर्तीयांच्या नावांवर मालमत्ता आणि वाहने खरेदी केली. ती मालमत्ता जवळपास तीन कोटींची असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions afghan sufi luxurious lifestyle discussion after the murder amy
First published on: 07-07-2022 at 00:04 IST