बोकड विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल

बोकडांच्या खरेदी-विक्रीसाठी बाजार समितीत मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली.

बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर नांदगाव बाजार समितीत विक्रीसाठी  मोठय़ा प्रमाणावर बोकड आणण्यात आले होते. जमलेल्या गर्दीकडून करोना नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. (छाया-संदीप जेजूरकर)

बकरी ईदमुळे ५० हजारापर्यंत मागणी

नांदगाव : मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या बकरी ईद सणाला अजून आठवडा बाकी असला तरी या सणाला देण्यात येणाऱ्या ‘ कुर्बानी ‘साठी बोकड खरेदी करण्याकडे आतापासूनच लक्ष देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथील बाजार समितीत बोकड  खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल झाली. पाच हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत बोकडांना मागणी होती. विविध जातीचे बोकड शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते.

बोकडांच्या खरेदी-विक्रीसाठी बाजार समितीत मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. करोनाच्या संकटात भरडलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना गुरुवारच्या बाजारात त्यांच्या बोकडांना मिळालेल्या भावामुळे दिलासा मिळाला आहे. नांदगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधूनही अनेक पशुपालक त्यांचे बोकड घेऊन आले होते. वेगवेगळ्या जातीचे बोकड असल्याने खरेदी करतांना त्यांची वैशिठय़े पाहिली जात होती.

दरम्यान, बाजार समितीत मोठय़ा प्रमाणावर जमलेल्या गर्दीकडून करोना नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. बहुतांश जण मुखपट्टीविनाच फिरत होते. सामाजिक अंतराचा तर लवलेशही दिसला नाही. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे घरीच नमाज अदा करून  बकरी ईद  शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याचे आवाहन यावेळी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Millions of rupees turnover in goat sales zws