जळगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार घडवून आणला. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रचंड व्यापातही आपल्या गायनाच्या आवडीला जपत त्यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले गीत आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे गीत युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले असून अल्पावधीतच विठ्ठलभक्त, वारकरी आणि संगीतप्रेमींकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या हरहुन्नरी आणि मिश्किल स्वभावासाठी राज्यभर परिचित असलेल्या गुलाबराव पाटील यांनी यावेळी राजकारणापलीकडे जाऊन भक्तीभावातून साकारलेले हे गीत भाविकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरत आहे. वारकरी संप्रदायाविषयी असलेली त्यांची आस्था आणि विठ्ठलभक्ती ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्ष कृतीतूनही सातत्याने दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतःच्या स्वखर्चातून हजारो वारकऱ्यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी विशेष रेल्वेने पाठविण्याचा उपक्रम राबवत असतात. यंदाही ही परंपरा कायम राखत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकऱ्यांना विशेष रेल्वेद्वारे पंढरपूर येथे रवाना करण्यात आले. हा भव्य सोहळा शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रेल्वे स्थानकावर विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचा आनंद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

वारकऱ्यांसमोर भक्तिगायन; दिंडीतही सहभाग

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित हजारो वारकऱ्यांसमोर “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे गीत स्वतःच्या कंठातून सादर केले. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने वातावरण अधिकच भारावून गेले. हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात त्यांच्या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित भाविकांनी “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम” अशा जयघोषात पालकमंत्र्यांच्या गायनाचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्वतः दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसमवेत टाळ वाजवत अभंगांचा गजर केला. कोणताही राजकीय बडेजाव न ठेवता सामान्य वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांनी वारीचा आनंद लुटला. विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या पालकमंत्र्यांचे हे रूप अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. दिंडीतील वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि सर्वांना सुखरूप दर्शन होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस

पंढरपूरकडे विशेष रेल्वे रवाना होण्यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, दिव्यांग भाविक तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची त्यांनी विशेष काळजी घेतली. प्रत्येकाशी संवाद साधत प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करून घेतली. रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर स्वतः लक्ष ठेवत होते. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांना आवश्यक त्या सूचना देत त्यांनी प्रत्येक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध असल्याची पाहणी केली. वारकऱ्यांच्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी विशेष रेल्वेतील प्रत्येक डब्यात दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, आवश्यक औषधांचा साठा, पिण्याचे शुद्ध पाणी, चहा-नाश्ता तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रवासादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.

दर्शनापासून महाप्रसादापर्यंत व्यवस्था

पंढरपूर येथे पोहचल्यानंतर वारकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, चंद्रभागा नदीत स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे. राजकीय जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्माची सांगड घालत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवलेला हा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी मोठा आधार ठरत आहे. हजारो भाविकांना विनामूल्य पंढरपूर वारीची संधी उपलब्ध करून देत त्यांनी सेवाभावाची परंपरा जोपासली आहे. यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी सादर केलेले “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे भक्तिगीत आणि हजारो वारकऱ्यांसोबत केलेली विठ्ठलभक्ती यामुळे भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

https://youtu.be/M8MZEdkRVxo?si=Ow8bkh32LsaOOUh3