धुळे : स्टॉर्च युनिव्हर्सल कंपनीच्या युनिव्हर्सल स्टार्च फॅक्टरीत दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील सायलो प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी पुरवठा करण्याच्या नावाखाली तब्बल ३० लाख २५ हजार रुपयांची रक्कम उचलून मशिनरी न देता कंपनीची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेत सुमारे एक कोटी १० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे या फिर्यादित म्हटले आहे. हा प्रकल्प राज्याचे पणन व राजशीष्टाचार तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांच्याशी संबंधित आहे.

या प्रकरणी निलेश भटू बागल (३२, रा. निमगुळ, ता. शिंदखेडा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, दोंडाईचा येथील युनिव्हर्सल स्टार्च फॅक्टरीमध्ये केम-अलाईड सायलो प्रोजेक्टसाठी लागणारी मशिनरी बंद अवस्थेत असल्याने ती रतलाम येथील खेतान अ‍ॅग्रोटेक येथून मिळवून देण्याबाबत इंदूर येथील शर्मा अ‍ॅग्रोटेकचे प्रमोद नथमल शर्मा व नथमल शर्मा यांच्याशी ७ मार्च २०२२ रोजी लेखी व्यवहार ठरविण्यात आला होता.

या व्यवहाराची एकूण रक्कम ६७ लाख २६ हजार रुपये इतकी ठरविण्यात आली होती. यानंतर २५ मार्च २०२२ रोजी संबंधित मशिनरीसाठी पर्चेस ऑर्डर देण्यात आली. त्यानुसार दिनांक २८ मार्च २०२२ रोजी आरटीजीएसद्वारे ३० लाख २५ हजार रुपयांची रक्कम शर्मा अ‍ॅग्रोटेक इंदूर यांना अदा करण्यात आली. मात्र, ठरलेल्या कालावधीत संबंधित मशिनरीचा पुरवठा करण्यात आला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली.

शर्मा अ‍ॅग्रोटेक इंदूर, खेतान अ‍ॅग्रोटेक रतलाम तसेच इतर संबंधित आरोपींनी आपापसातील आर्थिक अडचणी व व्यवहारांमुळे संगनमत करून फिर्यादी यांच्या फॅक्टरीसाठी लागणारी सायलो प्रोजेक्टची मशिनरी वेळेत न पुरवता, त्यांच्याकडून घेतलेली ३० लाख २५ हजार रुपयांची रक्कम परत न देता विश्वासघात केला. या प्रकरणामुळे फॅक्टरीला मशिनरी बसविण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनावर परिणाम होऊन सुमारे एक कोटी १० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा फिर्यादी यांनी केला आहे.

या प्रकरणी प्रमोद नथमल शर्मा व नथमल शर्मा (रा. क्लार्क कॉलनी, इंदूर), खेतान अ‍ॅग्रोटेकचे एस. के. झा (इंदूर), वरुण इन्फोटेक ग्वालियरचे जितेंद्र अशाराम नागवाणी तसेच स्टार डिजी होम इंदूरचे शावीर खान लियाकत खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इमरान खान यांच्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या रकमेच्या या फसवणुकीमुळे दोंडाईचा-शिंदखेडा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात ठाऊक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

परिसराच्या विकासाला हातभार

माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांचा दोंडाईचा येथील या स्टार्च प्रकल्पाशी थेट व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध आहे. ‘युनिव्हर्सल स्टार्च- केम अलाईड लिमिटेड’ असे या प्रकल्पाचे नाव असून या स्टार्च प्रकल्पाची स्थापना जयकुमार रावल यांचे आजोबा आणि ‘सहकार महर्षी’ म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब रावल यांनी केली. हा प्रकल्प मका प्रक्रियेवर आधारित असून तो उत्तर महाराष्ट्रातील (धुळे-नंदुरबार) सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. या कारखान्यामुळे दोंडाईचा आणि शिंदखेडा परिसरातील हजारो शेतकऱ्यांना मका पिकासाठी बाजारपेठ आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, ज्याचा जयकुमार रावल यांच्या राजकीय वर्चस्वातही मोठा वाटा मानला जातो.