नाशिक – जळगावच्या चोपडा तालुक्यात शेतातून घरी परतणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीला एकाने शेतात ओढून अत्याचारानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेनंतर संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून चोपड्यात रास्ता रोको आंदोलन केले. संशयिताला न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी सायंकाळी चोपडा तालुक्यातील विरवाडा भागात ही घटना घडली. शेतमजुराच्या मुली शेतातील काम आटोपून घरी निघाल्या असता संशयिताने एका अल्पवयीन मुलीला ओढून नेले. या प्रकाराने भयभीत झालेल्या अन्य लहान बहिणींनी गावाकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर ३० ते ४० ग्रामस्थांनी उपरोक्त भागात शोध सुरू केला. मुलगी विवस्त्र, चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत कापसाच्या शेतात आढळली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

हेही वाचा – मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार

हेही वाचा – नाशिक : शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेने रात्री ११ वाजता संशयित मुकेश बारेला (२१, मूळ रा.बलवाडी, मध्य प्रदेश, सध्या पाटचारीजवळ, चोपडा) याला ताब्यात घेतले. संशयिताविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन दिले.