‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवास ४० हजारांहून अधिकजणांची भेट
जिल्हास्तर कधीच ओलांडून राज्याच्या अन्य भागातही चव पसरलेल्या येथील मिसळींचे विविध प्रकार आणि खाण्यातून मिळणारा अनोखा आनंद यातून घडलेली ‘मिसळ खवय्यांची’ सफर विश्वास लॉन्सवर अभूतपूर्व गर्दीने फुलून गेली. या सफरीत ४० हजारपेक्षा अधिक खवय्यांनी मिसळीच्या बहुविध प्रकारांवर भरपेट ताव मारला.
त्यासाठी निमित्त होते ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमातंर्गत विश्वास बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवाचे. दोन दिवसीय महोत्सवाचा समारोप रविवारी दुपारी झाला. घरगुती काळा मसाला, लाल मसाला यांचा वापर, मूग उसळ यांसह रसपूर्ण जिलेबी, ताक, मठ्ठा, चहा अशा अनेक प्रकारच्या अस्सल चवीने उत्सवात रंगत आणली. नाशिकबरोबरच मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, इंदूर येथील मिसळ शौकिनांनी हजेरी लावली. ज्येष्ठांबरोबरच युवावर्गानेही महोत्सवास उदंड प्रतिसाद दिला. नाशिकमधल्या प्रसिद्ध मिसळी एकाच ठिकाणी आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न संयोजक विश्वास ठाकूर यांच्या सुयोग्य नियोजनाने यशस्वी झाला. या महोत्सवास मिळालेल्या प्रतिसादामुळे नाशिकची ओळख आता ‘मिसळींचे शहर’ म्हणून प्रसिध्द होईल, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केली. महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमधील चित्रकारांच्या चित्र प्रदर्शनाचे ‘मिसळ क्लब’तर्फे आयोजन करण्यात आले होते. त्यासही रसिकांकडून प्रतिसाद मिळाला