scorecardresearch

लसीकरणासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ अंतिम टप्प्यात

बालकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी वेगवेगळी सुई, लसीकरण करण्यात येते.

mission indradhanush
‘मिशन इंद्रधनुष्य’ हाती घेण्याची वेळ येत आहे. या उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी चार टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार

‘दो बूंद जिंदगी के’ असे जाहिरातीद्वारे कितीही सांगितले जात असले तरी लसीकरणाविषयी कमालीची अनास्था असल्याने आरोग्य विभागाला वारंवार ‘मिशन इंद्रधनुष्य’ हाती घेण्याची वेळ येत आहे. या उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी चार टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून त्याबाबत कृती आराखडा, नियोजन अंतिम टप्पात आहे.

बालकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी वेगवेगळी सुई, लसीकरण करण्यात येते. विशेषत शून्य ते सहा वयोगटातील अन् त्यामध्येही पहिल्या पाच वर्षांत बालकांमध्ये होणारे लसीकरण महत्वाचे ठरते. संसर्गजन्य आजार किंवा दुर्धर आजाराची लागण होत बालमृत्यू होऊ नये याकरीता हे लसीकरण महत्वाची भूमिका निभावते.

वयोगटानुसार बालकांना नियमितपणे पोलिओ, बीसीजी, पोलिओ बुस्टर, काविळ, गोवर, वेगवेगळी जीवनसत्वे, कांजण्या, मेंदुज्वर यासह नियमित लसीकरणांतर्गत जे आवश्यक आहे, ते लसीकरण होणे गरजेचे आहे. नोकरदार किंवा स्थानिकाकडून खासगी किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये लसीकरण केले जाते. मात्र स्थलांतरीत तसेच पोटा-पाण्यासाठी गावोगाव भटकंती करणारे मजूर, विशिष्ट समाज आजही लसीकरणाबाबत कमालीचा उदासिन तसेच अनभिज्ञ आहे. यामुळे बालकांमध्ये कुपोषणासह अन्य काही आजार आढळतात.

या पाश्र्वभूमीवर, आरोग्य विभागाने मागील वर्षी ‘मिशन इंद्रधनुष्य’ हा उपक्रम हाती घेतला. त्या अंतर्गत गत वर्षी नाशिकमधून ९८४ वंचित बालकांना लसीकरण करण्यात आले. यंदा उपक्रमाचे दुसरे वर्ष असून राज्यातील १८ जिल्हे, नऊ नगरपालिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

त्यात नाशिकचा समावेश आहे. ७ एप्रिलपासून पुढील सात दिवस हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जाईल. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

निफाड, मालेगाव रडारवर

निफाड तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर द्राक्ष व ऊस शेती असल्याने बाहेरून रोजगारासाठी येणाऱ्या शेत मजुरांची संख्या अतिशय मोठी आहे. मालेगाव येथेही स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याने निफाड व मालेगाव येथील स्थलांतरीत शेतमजरू, कामगार तसेच श्रमजीवी घटकांवर मिशन इंद्रधनुच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

१९४ ठिकाणी सर्वेक्षण

इंद्रधनुष्य सप्ताहात नियमीत लसीकरणापासून वंचित बालकांवर लक्ष केंद्रीत करतांना वीटभट्टीवरील मजूर, बांधकाम कामगार, शेती कामासाठी ठिकठिकाणाहून आलेले मजूर, भटक्या वस्ती, ज्या ठिकाणी आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत, अशा ११ निकषांवर सर्वच तालुक्यात तळागाळापर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी १९४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पाहणीत वंचित बालक आढळले तर त्याला आरोग्यपत्रिका दिली जाईल त्यावर लाल अक्षरात ‘एच आर अर्थात हाय रिस्क’ हा शेरा नोंदविण्यात येणार आहे. बालकांचा वयोगट पाहता त्याला आवश्यक लसीकरण करण्यात येईल. त्याच्या पालकाचा संपूर्ण तपशील जमा करत त्याची यादी तयार केली जाणार आहे. या मुलांचा पाठपुरावा करण्यासाठी हे पालक पुन्हा ज्या मूळगावी जातील, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-04-2017 at 02:45 IST
ताज्या बातम्या