नंदुरबार – निवडणूकीत पार्टी देण्याचे आश्वासन पूर्ण करताना नंदुरबारमधल्या सुमारे ४० हजार शालेय विद्यार्थ्यांना पावभाजी आणि आईस्क्रिमजी मेजवानी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून आश्वासन पूर्ती केली.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जेवणावळी आणि पार्ट्या हा चर्चेचा विषय राहिला आहे. मतदारांना भुलविण्यासाठी उमेदवारांकडून नगरपरिषद निवडणुकीतदेखील मोठ्या जेवणावळी देण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु, जे मतदारच नाहीत, अशा बालगोपाळांना आणि मुलांना कोण पार्टी देणार, असा प्रश्न नेहमीच सर्वांना असतो. त्यामुळे बाल गोपाळांना शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार चंद्रकात रघुवंशी यांनी निवडणूकीनंतर पार्टीचे आश्वासन दिले होते.
निकाल काहीही लागो, तरीदेखील नंदुरबारमधल्या बालगोपाळांना मी पार्टी देईन, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा योग साधत नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वतीने जवळपास ४० हजार शालेय विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी देण्यात आली.
शहरातील सर्वच शाळांमध्ये रितसर परवानगी घेवून शिवसेनेने दोन दिवस विद्यार्थ्याचे नियोजन करुन पावभाजी आणि आईस्क्रिमची पार्टी बालकांना दिली. नंदुरबारमधील निम्म्या शाळांमधील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना सकाळ आणि दुपारच्या सत्रात ही पार्टी देण्यात आली. उर्वरीत २० हजार विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी अशाच पद्धतीने नियोजन करुन पार्टी देण्यात आली.
निवडणुकीतील आश्वासनपूर्तीची पार्टी म्हटल्यानंतर बालगोपाळांनी देखील पावभाजीवर चांगलाच ताव मारला. पहिली ते चौथीचे विद्यार्थी ही पावभाजी आणि आईस्क्रिम पार्टी नेमकी कशासाठी, हे माहीत नसतानाही मिळालेल्या पार्टीने खुष असल्याचे दिसून आले. या ४० हजार विद्यार्थ्यांच्या पावभाजी नियोजनासाठी शहरातील सर्वच पावभाजी विक्रेत्यांची बैठक घेवून त्यांना शाळानिहाय पावभाजीची ऑर्डर ठरवून देण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस दोन सत्रात होत असलेल्या या पार्टीचे नियोजनही उत्तम झाल्याचे दिसून आले.
स्वत: आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शाळांना भेट देवून त्याठिकाणच्या पावभाजी वाटपाचा आढावा घेत होते. विद्यार्थ्यांना पोटभर आणि पावही हवे तितके मिळाले की नाही याची देखील चौकशी करीत होते. निवडणुकीत दिलेले आश्वासन एकीकडे हवेत विरळ होत असून पुढारी त्याला सोईस्कररित्या विसरून जात असतांनाच जे मतदारच नाही अशांना दिलेला शब्ददेखील पाळण्यात आला. त्यामुळे या पावभाजी पार्टीची चर्चा नंदुरबारमध्ये चांगलीच रंगली.
शिवसेनेने या पावभाजी पार्टीच्या माध्यमातून आगामी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तर नाही केला, असा मिश्कील प्रश्न देखील यातून उपस्थित होत आहे. कारण काहीही असो या पावभाजी आणि आईस्क्रिम पार्टीने शहरातील ४० हजार शालेय विद्यार्थी मात्र खुष झाल्याचे दिसून आले.
