नाशिक – शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध २९ गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना दीड वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बदनामी, माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात त्यांची भूमिका राहिली, याकडे लक्ष वेधत आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली.

बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशास कडाडून विरोध दर्शविला. त्यांना प्रवेश दिल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईल. आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील, ही बाब संबंधितांनी मांडली.

ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशाच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी एकटवले आहेत. आमदार हिरे यांच्या नेतृत्वाखाली १४ नगरसेवक, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोनाली ठाकरे, प्रदेश पदाधिकारी प्रदीप पेशकार, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आदींनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष चव्हाण यांची भेट घेऊन बडगुजरांची कुंडलीच निवेदनातून सादर केली.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताशी बडगुजरांचे संबंध आहे. पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाईची तयारी केली होती. बडगुजरांच्या मुलावर वकिलावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. महिला आयोगाच्या प्रमुख विजयाताई रहाटकर यांनी आयोजिलेला भाजपचा महिला मेळावा बडगुजरांनी गुंड पाठवून उधळून लावला होता. इतकेच नव्हे तर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे मकाऊ येथील छायाचित्रात खोडसाळपणा करून बदनामी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना भोजन करीत असताना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. अशा अनेक घटनांशी बडगुजरांचा संबंध असून त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईल आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील, असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.