जळगाव : जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतील बंडखोरीचा पेच सुटल्याने वातावरण शांत होईल, अशी अपेक्षा असतानाच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महायुतीसह राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल, असा दावा चौधरी यांनी केल्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच राजकीय घडामोडींमुळे चर्चेत राहिली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेला वाद, त्यानंतर झालेल्या बैठका, समन्वयाचे प्रयत्न आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी झालेल्या हालचाली, यामुळे निवडणुकीचे चित्र अनेकदा बदलताना दिसले. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या नाराजीमुळे महायुतीसमोर मतविभाजनाचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील मते फुटण्याची भीतीही व्यक्त झाली होती.

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महायुतीतील उघड बंडखोरीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महायुतीने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

चौधरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महायुती एकसंघ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. पत्रकारांशी संवाद साधताना चौधरी यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधल्याचेही सांगितले. माझ्याशी अनेक स्तरांवर चर्चा झाली. निवडणूक लढवू नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र, मी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मैदानात कायम आहे. २०१० च्या निवडणुकीतही मी रिंगणात होतो. आणि त्यावेळीही मला चांगली मते मिळाली होती. असे चौधरी यांनी सांगितले. याशिवाय महायुतीतील अनेक नाराज पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपल्याला पाठिंबा देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुलाबराव पाटील आशीर्वाद का देतील?

चौधरी यांच्या वक्तव्यातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत केलेला दावा. उमेदवारीवरुन महायुतीत मोठे मतभेद आहेत. त्यामुळे मंत्री पाटील मलाच आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा असल्याचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख करत चौधरी यांनी केलेला दावा भाजपच्या गोटातही चर्चेचा विषय ठरला आहे.

राजकीय समीकरणांवर लक्ष

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महापालिका, नगर पंचायती तसेच नगरपालिकांमध्ये निवडून आलेले नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक पातळीवरील संबंध, वैयक्तिक समीकरणे आणि नाराज गटांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा दावा केला जात असला, तरी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी केलेले दावे आणि त्यातून निर्माण झालेली राजकीय चर्चा निवडणुकीत शेवटपर्यंत रंगत कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.