ग्रामीण भागातही मनसेची बिकट स्थिती

मनसेची ग्रामीण भागातील स्थिती शहरापेक्षा बिकट आहे.

आघाडीचा प्रस्ताव नसल्याने जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर 

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेपासून दूर होण्याची एकीकडे नगरसेवकांमध्ये जणूकाही स्पर्धाच सुरू असल्याचे चिन्ह असताना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात शहरापेक्षा त्यांची अवस्था अधिक बिकट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यासह इतर कोणत्याही पक्षांकडून आघाडीचा प्रस्ताव येत नसल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढविण्याशिवाय मनसेसमोर गत्यंतरही उरलेले नाही. काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आलेले रतनकुमार इचम आपल्या कुवतीनुसार ग्रामीण भागात खिंड लढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी मनसेच्या तालुका स्तरावरील बैठकांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे इगतपुरीसह एक-दोन तालुक्यांचा अपवादवगळता पाहावयास मिळत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इतर राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना मनसे अजूनही काही तालुक्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यातच गुंतला आहे. नांदगाव येथे जिल्हाध्यक्ष इचम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नांदगाव तालुका तसेच मनमाड शहराची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

तालुका सरचिटणीसपदी संतोष आहेर, तालुका उपाध्यक्ष रोशन पांडे, सतीश हिरे, तालुका संघटक पद्माकर महानुभाव, मनमाड शहराध्यक्ष नानासाहेब आहेर आदींचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.

बैठकीस सरचिटणीस सुनील खडके, जिल्हा संघटक योगेश सोनार, तालुका अध्यक्ष शिवाजी आहेर, अशोक राजपूत, राजू तरंगे, येवला तालुका अध्यक्ष सुयोग गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष नवलकुमार शिंदे तसेच नांदगाव, येवला, चांदवड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे ऐन भरात असतानाही जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत त्यांची कामगिरी जेमतेमच राहिली होती. आता तर महापालिकेत सत्ता असूनही नाशिकमध्ये विद्यमान नगरसेवक मनसेपासून बाजूला होत आहेत.

इगतपुरीवगळता इतर ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड

मनसेची ग्रामीण भागातील स्थिती शहरापेक्षा बिकट आहे.  इगतपुरीसारख्या काही तालुक्यांमध्ये निष्ठावंतांमुळे मनसेचे अस्तित्व बऱ्यापैकी आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र मनसेला अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात संपूर्ण जिल्ह्य़ासाठी आघाडी होईल की नाही हे सांगता येणे अनिश्चित असताना आणि शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसताना मनसेबरोबर चर्चा करण्याची या कोणत्याही पक्षांना गरज भासत नसल्याचे वाटत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही याची चांगलीच जाणीव असल्याने निवडणूक लढवायची असेल तर स्वबळाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून त्याप्रमाणे नियोजन करण्याची सूचना नांदगावच्या बैठकीत करण्यात आली. जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांपेक्षा मनसेने इगतपुरीत आपले अस्तित्व जिवंत ठेवताना शेतकऱ्यांच्याप्रश्नी विविध आंदोलने केली. वेगवेगळ्या कारणास्तव होणारे भूसंपादन असो, किंवा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरी देण्याचा विषय असो, इतर पक्षांपेक्षा मनसेने घेतलेली आक्रमक भूमिका त्यांच्यासाठी काही प्रमाणात लाभदायक ठरली आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र असे दिसून आले नाही. त्यामुळेच स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी का होईना, प्रत्येक जागेसाठी उमेदवार देणार कसा, हा प्रश्न मनसेला सोडवावा लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns condition in rural areas