अमित ठाकरेंवर नागरी प्रश्नांची सरबत्ती

शस्त्रसंग्रहालयात अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य, उद्यानात जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड

शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाची पाहणी करतांना मनसेचे नेते अमित ठाकरे.        (छाया-यतीश भानू)

शस्त्रसंग्रहालयात अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य, उद्यानात जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड

नाशिक : गंगापूर रस्त्यावरील शस्त्र संग्रहालयाच्या परिसरात दोन वर्षांत साफसफाई झाली नाही. पालापाचोळा उचलला गेला नाही. तो कुजल्याने दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला. सापांचा सुळसुळाट आहे.  वीज जोडणी खंडित झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या ठिकाणी आतमध्ये उद्यान आहे. तथापि, संग्रहालय आणि उद्यानाचे प्रवेशद्वार एकच असल्याने उद्यानात जाण्यासाठी तिकीटाचा भुर्दंड सहन करावा लागतो. असे अनेक प्रश्न, समस्यांना मनसेचे नेते अमित ठाकरे यांना सामोरे जावे लागले.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी गुरूवारी मनसेच्या सत्ताकाळात शहरात साकारलेल्या काही पथदर्शी प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन परिसरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाची स्थिती त्यांनी पाहिली. संग्रहालयाचा वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे दालनात अंधार पसरलेला होता. अमित ठाकरे आल्याचे समजल्यानंतर आसपासचे काही नागरिक त्यांना भेटायला आले. संग्रहालय परिसराची स्थिती त्यांनी मांडली. वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रीच्या वेळी संग्रहालय परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही स्वच्छता केली जात नाही, अशी तक्रार डी. बी. बोरसे यांनी केली. याच भागातील रहिवासी अरविंद पंचाक्षरी यांनी संग्रहालय आवारातील उद्यानात जाण्यासाठी लहान मुलांसह पालकांना नाहक शुल्काचा भरूदड सोसावा लागत असल्याकडे लक्ष वेधले.

सर्वाचे म्हणणे जाणून घेत अमित ठाकरे यांनी पाहणी झाल्यानंतर महापालिकेत जाणार असल्याचे सांगितले. या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजकारण बाजूला ठेऊन प्रकल्पांची सुधारणा करा

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहरात तयार झालेल्या काही प्रकल्पांची अतिशय दुरावस्था झाली आहे. मनसे काळातील प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. पाहणी दौऱ्यानंतर अमित ठाकरे वगळता देशपांडे आणि अमेय खोपकर महापालिकेत दाखल झाले. मनसेने उभारलेल्या प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असून सत्ताधारी भाजपने मनसेच्या कार्यकाळातील प्रकल्प स्मार्ट सिटीत समाविष्ट केले. मनसेच्या कामावर भाजपची पोळी भाजली जात असल्याचे सांगितले.  शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. खोदकामाने रस्त्यांची अवस्था बिकट आहे पालिकेतील अभियंत्यांनी खड्डे बुजविले नाहीत तर त्या अभियंत्यांना मनसे खड्डय़ात बसवेल, असा इशारा देशपांडे यांनी दिला. ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कच्या जागेसाठी रेडिरेकनरच्या दराने भाडे आकारणी केली जाते. ही बाब अयोग्य असून या संदर्भात नगर विकास मंत्र्यांकडून हा विषय मार्गी लावला जाईल, असे सांगण्यात आले. कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक रंगकर्मीना दुरुत्तरे करतात. त्यांनी आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही तर मनसेच्या पध्दतीने सुधारणा केली जाईल, असे त्यांनी सूचित केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns leader amit thackeray on nashik tour ahead of corporation poll zws