अनिकेत साठे
नाशिक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले पत्र शहरात घरोघरी गेले का, हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. अद्याप ते गेले नसेल, तर घेऊन जा, या शब्दांत मनसेचे संपर्क नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मशिदीवरील भोंग्याच्या विषयावरून मध्यंतरी नाशिकसह राज्यात गदारोळ उडाला होता. नंतर राज यांनी पत्राद्वारे ध्वनिक्षेपकासाठी आवाजाची मर्यादा, त्रास झाल्यास तक्रार करावयाची पद्धत आदी माहिती देत हा प्रश्न सोडविण्यात नागरिकांचा सहभाग घेण्याचे नियोजन केले. साधारणत: २० दिवसांपूर्वी राज यांचे पत्र मनसेच्या नाशिक शाखेकडे प्राप्त झाले. परंतु, अद्याप अनेक भागात ते वितरित झालेले नाही. त्यात कालापव्यय होत असल्याने नांदगावकर यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.

मनसेच्या येथील राजगड या कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संवाद मेळाव्यात नांदगावकर यांनी पत्रवाटपाबाबत जाहीरपणे विचारणा केली होती. पदाधिकाऱ्यांना न दुखावता त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारण्याचा सल्ला दिला. राज यांचे पत्र मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नागरिकांशी जोडण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी मनसेने केल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा मशिदीवरील भोंगे उतरले, पहाटेचे अजान बंद झाले, दिवसभरातील अजान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमानुसार कमी आवाजात होऊ लागल्याकडे राज यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

मनसेच्या आंदोलनामुळे ही बाब दृष्टिपथास आली. पण नियमपालनाचा आग्रह धरणाऱ्या २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना नोटिसा बजावल्या गेल्या. भोंगे हटवा हे आंदोलन थांबलेले नसून त्यात नागरिकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार असायला हवा, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसेसाठी हे पत्र महत्त्वाचे ठरणार आहे. पत्र घेऊन येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकाचे नाव नागरिकांना भ्रमणध्वनीत समाविष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही संकटात, अडचणीच्यावेळी माझा महाराष्ट्र सैनिक तुमच्यासाठी धावून येईल अशी ग्वाही राज यांनी दिली आहे. यातून मनसेला घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

प्रत्यक्ष वितरणाचा मार्ग अनुसरला
या पत्राचा मजकूर प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची छपाई करीत वितरणाचे काम हाती घेतले. काही भागात हे काम युद्धपातळीवर झाले तर काही भागात ते संथपणे पुढे सरकत आहे. हे लक्षात घेऊन नांदगावकर यांनी पत्र वितरणाची सद्यस्थिती जाणून त्यास गती देण्याचे सूचित केले. दरम्यान, अनेक राजकीय पक्ष जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करतात. परंतु, राज यांनी त्यास छेद देत महाराष्ट्र सैनिकांमार्फत प्रत्यक्ष वितरणाचा मार्ग अनुसरला आहे. मनपा निवडणुकीच्या प्रचाराला मनसेने पत्राद्वारे श्रीगणेशा केला आहे.

राज ठाकरे यांचे पत्र महाराष्ट्र सैनिक घरोघरी जाऊन वितरित करीत आहेत. सिडको आणि सातपूर भागात वितरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भागात हे काम प्रगतिपथावर आहे. मुस्लीमबहुल भागात पत्राचे वाटप केले जात नाही. शहरातील बहुतांश भागात वितरण झालेले आहे. – दिलीप दातीर (शहराध्यक्ष, मनसे)