एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक दुर्घटनेनंतर मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व मनसेमध्ये जुंपली आहे. या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पक्षाच्या कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार व बांगडय़ा घालत जोडे मारो आंदोलन केले.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक दुर्घटनेत २३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानक व परिसर फेरीवालामुक्त करण्याची मागणी केली.

अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मनसेने १५ दिवसांची मुदत दिली होती. त्या काळात प्रशासनाने फेरीवाल्यांना हटविले नाही. यामुळे मनसेच्या पद्धतीने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरू झाले. या घडामोडीत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. निरुपम यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजगड पक्ष कार्यालयाबाहेर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलांचा हार व बांगडय़ा घालून जोडे मारो आंदोलन केले.

त्यात जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, सुरेश भंदुरे, मध्य विभागचे अंकुश पवार, कामिनी दोंदे, धनश्री ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेतली. आंदोलकांना ताब्यात घेतले. दुपारनंतर त्यांची सुटका करण्यात आली.