नवे संघटक, मनविसेचीही कार्यकारिणी जाहीर
अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक – नाशिक लोकसभा मतदार संघात नव्या संघटकांची नियुक्ती आणि शहर मनविसेत फेरबदल करत नवीन कार्यकारिणी जाहीर करुन मनसेने सहा विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पदाधिकारी व मनसैनिकांनी प्रत्येक कॉलनी, चौक, नाक्यांवर जनतेशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले.
हेही वाचा >>> बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न – कौशल्य विकास कार्यक्रमात छगन भुजबळ
रविवारी ठाकरे यांनी राजगड कार्यालयात नाशिक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेने संघटकपदाची जबाबदारी ॲड. किशोर शिंदे आणि गणेश सातपुते यांच्यावर सोपविली आहे. मनविसेची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मनविसेच्या शहराध्यक्षपदी ललित वाघ यांची तर शहर संघटकपदी अक्षय कोंबडे यांची नियुक्ती झाली. शहर उपाध्यक्षांची नावे जाहीर करताना पक्षाने त्यांना कार्यक्षेत्रही निश्चित करून दिले आहे. त्यानुसार अभिषेक सूर्यवंशी (पूर्व विभाग, पंचवटी), शुभम गायकवाड (जुने नाशिक), नील रौंदळ (गंगापूर रोड, मध्य नाशिक), वैभव देवरे (सातपूर विभाग), प्रशांत बारगळ (नाशिकरोड), रोहन जगताप (सिडको), अमोल भालेराव (आनंदवल्ली), सुयश मंत्री (पंचवटी विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सात विभागीय अध्यक्षांची नेमणूक ठाकरे यांनी जाहीर केली.
हेही वाचा >>> नाशिक: सारंगखेडा पुलाला भगदाड, नंदुरबार-धुळे वाहतूक मार्गात बदल
संघटनात्मक पातळीवर बदल करताना मनसेचे नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारीवर भर दिला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. पदाधिकारी व मनसैनिकांनी जनतेच्या संपर्कात राहण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याची स्पष्टता झालेली नाही. परंतु, नाशिक लोकसभा मतदार संघातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या सहा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मनविसेची राज्यातील सर्वात प्रबळ व प्रभावी विद्यार्थी संघटना अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.