महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा; दुकानदारांना पत्रकांचे वाटप
शहरातील व्यावसायिकांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून व्यवसाय फलक मराठीत करावेत अन्यथा त्यास खास उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. आपला व्यवसाय फलक मराठीत लावावा, यासाठी नाशिकरोड विभागात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकांचे वितरण केले. काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणारा मनसे मध्यंतरी शांत होता. तथापि, पुढील वर्षांत महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन या पक्षाने पुन्हा हा मुद्दा लावून धरण्याची धडपड सुरू केली आहे.
२७ जानेवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधून प्रकाश कोरडे, संतोष सहाणे, सुरेंद्र शेजवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिकरोड विभागातील व्यावसायिकांना पत्रके वाटली. अनेक वर्षांपासून आपण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहात. आपले व्यवसाय व उद्योग धंदेही या ठिकाणी असून त्याबद्दल मनसेला आनंद आहे. तथापि, आपला व्यावसायिक फलक मराठीत वापरत नसल्याबद्दल पत्रकात खेद व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम अन्वये आपण व्यवसाय करत असलेल्या ठिकाणचे व्यवसायिक फलक मातृभाषेतील असले पाहिजे असे बंधनकारक आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी तसे फलक नसल्याचे दिसते. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन असून त्याचे औचित्य साधून आपला व्यवसाय फलक मराठीत करावा, असे साकडे मनसेने घातले आहे.

काही वर्षांपूर्वी मनसेने मराठी फलकांच्या मुद्यावरून आक्रमक स्वरुपात आंदोलने केली होती. परप्रांतीयांच्या विरोधात पक्षाने भूमिका घेऊन आंदोलने केली. मागील तीन वर्षांपासून थंडावलेला हा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पुन्हा पक्षाने बाहेर काढला आहे. या मुद्यावरून मराठी जनांची मते खेचण्याचा पक्षाचा प्रयत्न असून त्याचे प्रत्यंतर या वितरणातून येत आहे. महापालिका निवडणूक वर्षभरावर आली आहे. तीन वर्ष मराठीच्या मुद्यावर मौन बाळगणाऱ्या मनसेला अचानक फलकांची आठवण कशी आली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. फलक मराठीतून असण्याच्या मुद्यावरून मनसे पुन्हा मराठी विषयावर आक्रमक होण्याची चिन्हे दिसत असून यापुढेही वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे हा मुद्दा पुढे रेटण्याचा मनसेचा प्रयत्न राहील हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.