केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील नागरिकांना महापालिकेशी साध्या सोप्या पध्दतीने संपर्क साधता यावा, यासाठी निर्मिलेल्या ‘स्मार्ट नाशिक अॅप’द्वारे प्रशासनाच्या कामात पारदर्शकता जपण्यासोबत कामातील अनियमिततांवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे.अॅपचे वैशिष्ठय़े म्हणजे, त्यातील काही बाबी कोणत्याही राज्य वा शहराच्या अॅपमध्ये उपलब्ध नसल्याचा उल्लेख आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केला.
‘स्मार्ट मोबाइल’मध्ये विनामूल्य स्वरुपात कोणालाही हे ‘अॅप्लीकेशन डाऊनलोड’ करता येईल. मराठी व इंग्रजी भाषेत त्याचा वापर करता येईल. या अॅपद्वारे प्रत्येक विभागाशी संबंधित तक्रार नोंदविता येईल. या तक्रारीचे पुढे काय झाले याची माहिती तक्रारदाराला पालिकेकडून कळविली जाईल. या अंतर्गत मदत वाहिनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार देण्याचा पर्याय आहे. नागरीक जन्म व मृत्यू दाखल्याची माहिती यावरून प्राप्त करू शकतात. विकास कामांची माहिती घेऊ शकतात. अॅपमार्फत घरपट्टी व पाणीपट्टीची देयके भरता येतील. कोणत्या तक्रारींसाठी कोणाशी संपर्क साधता येईल याचाही अंतर्भाव आहे. छायाचित्र व ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून तक्रार देता येईल. विभागनिहाय प्रलंबित, निपटारा झालेल्या तक्रारींचे अवलोकन प्रशासनाला करता येईल.
शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक कामाचा खर्च, सुरू झाल्याची व ते काम पूर्ण होण्याची तारीख, ठेकेदाराचे नाव आदी माहिती देणारे देशातील हे एकमेव अॅप असेल असा विश्वास गेडाम यांनी व्यक्त केला. ठेकेदार व अधिकाऱ्यांना काम पूर्ण झाल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही. त्यांना देखील प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून छायाचित्र अपलोड करणे बंधनकारक आहे. बनावट कामे दाखवून देयके उचलण्याच्या प्रकारांना पायबंद बसणार आहे. काम पूर्णत्वास गेल्याचे छायाचित्र, प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांची पाहणी या बाबी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे २० टक्के देयक रोखून धरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या सर्व सुविधा नव्याने निर्मिलेल्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सोमवारी दिवसभरात ६०० अॅप डाऊनलोड झाले. नव्या प्रणालीमुळे आगामी काळात महापालिकेकडे तक्रारींचा ओघ मोठय़ा प्रमाणात वाढणार असून अधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारण्यास सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घंटागाडी दैनंदिन कोणत्या मार्गावर फिरली याचे अवलोकन करण्याचे प्रस्तावित आहे. बनावट हजेरी लावण्याच्या प्रकारांना र्निबध घालण्यात आल्याचे गेडाम यांनी नमूद केले.

‘स्मार्ट’ संकल्पनेसाठी पारितोषिक
स्मार्ट सिटी संकेतस्थळावर शहरवासीयांना आपणास शहर कसे हवे आहे याबाबत संकल्पना मांडण्याची संधी देण्यात आली आहे. सर्वोत्तम संकल्पनांना पालिका रोख स्वरुपात पारितोषिक देणार असल्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली. त्यात प्रथम तीन क्रमांक आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिक दिली जाणार आहेत. पहिल्या क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० आणि तृतीय क्रमांकास २० हजारांचे तर प्रत्येक उत्तेजनार्थ पारितोषिक दहा हजार रुपयांचे राहणार आहे.