नाशिक : भोंगे वाजवून हवाई हल्ल्याची पूर्वसूचना, आग लागलेल्या ठिकाणाहून जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढणे, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविणे, जखमींवर प्रथमोपचार, अशी विविध प्रकारची रंगीत तालीम शहरातील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या बोट क्लब परिसरात पार पडली. पावसामुळे मैदानावर होणारा सराव याच भागातील रस्त्यावर करावा लागला. हे सर्वकाही अवघ्या अर्ध्या तासात पार पडले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने संभाव्य हवाई हल्ल्याबाबतच्या सुरक्षेसाठी सर्व राज्यांना बुधवारी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी आणि नागरी संरक्षण दलाच्यावतीने शहरातील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या बोट क्लब मैदान परिसरात ‘ऑपरेशन अभ्यास’ सराव प्रात्यक्षिके पार पडली. हवाई दलास रडारद्वारे प्राप्त झालेली सूचना नागरी संरक्षण दलाकडे पोहोचवली गेली. हवाई हल्ला झाल्याचा संदेश दिला गेल्यानंतर त्वरीत भोंगे वाजू लागले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने मार्गस्थ करण्यात आले.
दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू झाले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर उपस्थितांकडून भारत माता की जयचा जयघोष झाला. अवघ्या ३० मिनिटांत सराव पूर्ण झाला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, तहसीलदार गणेश जाधव, नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप, विभागीय क्षेत्ररक्षक मीनाक्षी गवळी, मंगला काकड, योगेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग रहावे. पुढील काळात प्रत्यक्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाल्यास नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संरक्षण दल सदैव सज्ज आहे. जलज शर्मा (जिल्हाधिकारी, नाशिक)