नाशिक : धार्मिक ध्रुवीकरणाच्या मार्गाने भाजप निवडणुकीत आपले ईप्सित साध्य करीत आहे. भारताची उदारमतवादी लोकशाही हुकूमशाही पद्धतीची लोकशाही म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी पु्न्हा सत्तेत आल्यास देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, केवळ तिचा देखावा केला जाईल. संपूर्ण देशात अस्तित्व असणारा काँग्रेसच भाजपला तोंड देऊ शकतो. त्यामुळे प्रादेशिक आणि समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधातील लढाईत सहभागी होण्याची गरज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. इंधनावरील करातून केंद्र सरकारने २७ लाख कोटी रुपये मिळवले. त्यातूनही सरकार चालवणे अवघड झाल्याने सरकारी कंपन्यांच्या विक्रीचा सपाटा लावला गेला. काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असून काश्मिरी पंडितांच्या हत्यांचे सत्र सुरू आहे. मोदी सरकारने आजवर विरोधी पक्षांशी चर्चेचे औदार्य दाखविले नसल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी हे आरएसएसचेही ऐकत नाहीत. वर्षांतून एकदा ते नागपूरला भेट देतात; पण आपल्याला जे वाटते, तेच ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

तीन पक्षांचे सरकार चालविणे कसरत

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष, निवडणूक प्रक्रियेतून त्याची निवड, चिंतन शिबीर आदी विषय मांडले होते, त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे ठरले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव होतो. त्यामुळे भाजपला पराभूत करायचे की आपला पक्ष वाढवायचा, यावर विचार करावा लागणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याची तक्रार होते. यावर त्यांनी तीन पक्षांचे सरकार चालविणे मोठी कसरत असल्याचे नमूद केले.