नंदुरबार – जिल्ह्यातील नवापूर शहरातील सार्वजनिक गुजराथी हायस्कूल आणि सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांचा उच्छाद वाढला असून या माकडांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले होत असल्याच्या घटनात वाढ झाली आहे. शालेय साहित्याचे नुकसान देखील होत असल्याने माकडांचा वाढता त्रास रोखण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी वनविभाग आणि तहसिलदार कार्यालयात धाव घेतली.

नवापूर शहरातील अत्यंत प्रसिध्द असलेल्या शाळेच्या परिसरात माकडाने शिक्षक सी. एस. पाटील, विजय कदम, जुनेद खान तसेच विद्यार्थी रुतवीज कोकणी, यहुशवा गावीत, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावीत व दिव्या भोई यांच्यावर हल्ला करत त्यांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. या शालेय परिसरात माकडांचा वावर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. ही माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तरल्चे, जेवणाच्या डब्यांचे व शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत. काही वेळा विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र केवळ तात्पुरती कार्यवाहीची मलपट्टी केल्या जात असल्याने माकडांचा त्रास वाढल्याने त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे.

अशातच या दोन्ही शाळांमध्ये दहावी आणि बारावी परीक्षा केंद्र आहे. परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली.

यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वनविभागाच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी तहसीलदारांसमोर व्यक्त केली. या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांची गाठभेट होत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. निवेदन दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले. त्यांनी माकड पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र या माकडामुळे यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे वनविभागाने माकडांबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देखील शिक्षकांनी दिला आहे.