Coronavirus : रुग्णसंख्येतील वाढ नाशिककरांसाठी चिंताजनक

शहरात २४ तासांत शंभरहून अधिक नवे रुग्ण, जिल्ह्य़ातील एकूण संख्या अडीच हजारांच्या टप्प्यावर 

शहरात २४ तासांत शंभरहून अधिक नवे रुग्ण, जिल्ह्य़ातील एकूण संख्या अडीच हजारांच्या टप्प्यावर 

नाशिक : शहरातील वाढत्या करोना रूग्णसंख्येमुळे दाट लोकवस्तीच्या भागात खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे, परिसरातील औषध दुकानांमध्ये नेमक्या कोणत्या औषधांची मागणी वाढली, या  माहितीच्या संकलनास महापालिकेने सुरूवात केली आहे. शहरात २४ तासात १०० हून अधिक रुग्ण सापडल्याने महापालिकेची यंत्रणाही धास्तावली आहे.

दाट लोकवस्तीच्या भागात समूह संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून उपायांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात शहर, ग्रामीण भागात नव्याने १९ रुग्ण आढळले. जिल्ह्य़ाची एकूण रुग्णसंख्या अडीच हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.

टाळेबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत असून वडाळा, जुने नाशिक, फुलेनगरसह दाट लोकवस्तीच्या भागात अधिक्याने रुग्ण सापडत आहेत. मालेगावच्या रुग्णसंख्येला नाशिकने पार केले. नाशिकची आकडेवारी एक हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. गुरूवारी एकाच दिवसात शहरात ११६ रुग्ण सापडले. शुक्रवारी यात पुन्हा नव्याने सहा रुग्णांची भर पडली. करोनाचा प्रसार होत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही दिडशेच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत करोनाचे ९८३ रुग्ण आढळले असून त्यातील ४०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत. ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार होत आहे. शुक्रवारी नव्याने आढळलेल्या १९ पैकी १३ सकारात्मक अहवाल येवला, इगतपुरी, पिंपळगाव, दिंडोरी येथील रुग्णांचे आहेत. जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या २४५१ वर पोहचली आहे. यातील १४९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकूण १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात सध्या ८०० रुग्ण उपचार घेत आहेत. यात मालेगाव शहरात सध्या ६७ तर जिल्ह्य़ाबाहेरील ११ रुग्ण उपचार घेत आहेत.

नाशिकमधील प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक लक्ष

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जुन्या नाशिकमधील फकिरवाडी या भागास भेट देऊन रहिवासी, खासगी डॉक्टरांसह औषध विक्रेत्यांशी चर्चा केली. खासगी डॉक्टरांकडे येणारे रुग्ण, त्यांची लक्षणे यांच्यासह औषध विक्रेत्यांकडे कोणत्या औषधांची मागणी वाढली याची माहिती घेण्यात आली. अंगणवाडी सेविका, आशा यांनी घरोघरातील माहिती  योग्य पध्दतीने घेऊन तपासणी करण्याची सूचना केली. नागरिकांच्या प्रबोधनार्थ घरोघरी माहितीपत्रक पाठविण्यासही गमे यांनी सांगितले. मुलतानपुरा दवाखाना येथे बाह्य़रोग आणि क्षयरोग तपासणी सुरू करण्याच्या दृष्टीने भेट दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: More than a hundred new covid 19 patients in nashik city in last 24 hours zws

ताज्या बातम्या