ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीला विमान निर्मितीसाठी सहा हजार ८२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय कंपनीत एचटीटी ४० प्रकारातील ६० विशेष ट्रेनर विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ओझर येथील एच.ए.एल. कंपनीला एचटीटी ४० प्रकारातील विमानांची निर्मिती करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. या कंपनीतील उपलब्ध मनुष्यबळ, विविध प्रकारची विमाने तयार करण्याचा प्रशासनाचा अनुभव या जोरावर हे काम एचएएलला मिळावे यासाठी संरक्षणमंत्री यांच्याकडे डाॅ. पवार यांनी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आणि एचएएलकडे काही वर्षांपासून कामाचा कमी झालेला ओघ विचारात घेता संरक्षणमंत्री यांनी एचएएलला ६० विमानांची निर्मिती करण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती लेखीपत्राद्वारे देण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>नाशिक: पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू
न्यू इंडिया २०२२ धोरणातंर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एचएएल ही प्रतिष्ठित भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असल्याचा नाशिकला अभिमान आहे. १९६४ पासून एचएएल देशाच्या संरक्षण उत्पादनात सक्रीय सहभाग घेत आहे. केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या दृष्टीने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाशिक एचएएल कंपनीस या विमान उत्पादनाचे कंत्राट दिल्यास नाशिक विभागासाठी सन्मानाची बाब ठरेल, असेही डॉ. पवार यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा >>>नाशिक: पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू
एचएएल कंपनीत यापूर्वी अनेक लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी ४० या प्रकारातील ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलकडे देण्याचा निर्णय संरक्षण विमानाने घेतला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाने एचएएल कंपनीतील सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक व्यवसायांसह इतर उद्योगांना चालना मिळणार असून रोजगार निर्मिती वाढणार आहे,
एचएलएल ओझर येथे ६० विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी सहा हजार ८२८ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वायुदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी ४० प्रकारातील ट्रेनर विमानाद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचा ताशी वेग ४०० किलोमीटर असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. सदरचे विमान हे पूर्णत: भारतीय बनावटीचे असणार आहे.-डाॅ. भारती पवार ( केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री)