जिल्हा पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील धान्य वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. २०१३ पासून नवीन शिधापत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसाठी देण्यात येणाऱ्या पिवळ्या शिधापत्रिकाही उपलब्ध नसल्याने केशरी शिधापत्रिकांवरच शिक्का मारून दिला जात आहे. त्यामुळे दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना इतर शासकीय कामांप्रसंगी अडचण येते. स्वस्त धान्य दुकानांमध्ये चांगल्या दर्जाचे धान्य मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रश्नांची विचारणा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ, प्रदेश संघटक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाचे कार्यालय गाठून पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे यांना घेराव घातला. नाशिकसाठी स्वतंत्र पुरवठा अधिकाऱ्याची नेमणूक नसणे, सिलिंडरधारकांना रॉकेल न देणे, याविषयीही पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप केला. पुरवठा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.