लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: पालकमंत्री मस्त… शेतकरी त्रस्त, चले जाव… चले जाव… पालकमंत्री चले जाव… अश घोषणा देत शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासह धरणगावकरांना सुरळीत व मुबलक पाणी मिळावे, या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी धरणगावचा पाणीप्रश्न आणि शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री अपयशी ठरले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला. विशेष म्हणजे महिलांनी हंडे घेऊन आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.




धरणगाव येथे ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात धरणगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जिल्हा उपप्रमुख शरद माळी, जिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.
आणखी वाचा-नाशिक: जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता, हातपंप शुध्दीकरण मोहीम
आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनासह पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सहसंपर्कप्रमुख वाघ यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात सध्या धरणगावकर बिकट पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात आहेत. कामे-धंदे सोडून धरणगावकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कापसाला भाव न मिळाल्याने शेतकरीही आर्थिक अडचणीत आहेत. २०२१-२२ पासून अतिवृष्टी व गारपीटग्रस्तांना अजूनही अनुदान मिळाले नाही यांसह विविध समस्यांना धरणगावसह तालुक्यातील शेतकर्यांना सामोरे जावे लागत आहे.
शेतकर्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान, सरसकट पीकविमा अनुदान, कांदा पीक नुकसान अनुदान मिळावे, तसेच बी-बियाणे, रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई थांबवावी, बी-बियाणे-खतांचा काळाबाजार थांबवावा, शेतकर्यांना राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेकडून पीककर्ज त्वरित उपलब्ध करून जोडधंद्यांसाठीही कर्ज द्यावे, पोकरा योजनेंतर्गत अनुदान तातडीने मिळावे, पंतप्रधान किसान योजनेतील त्रुटी काढून अनुदान द्यावे, पाणंद योजनेत गावागावी पक्के शेतरस्ते तयार करावेत, कृषिपंपासाठी दिवसा १२ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, नवीन वीज रोहित्रे तातडीने उपलब्ध करावीत, शिक्षणासाठी गाव तेथे एस. टी. बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी व शेतकर्यांना ५ हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे यांसह विविध मागण्यांकडे झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य शासनासह पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्यात आले, असेही वाघ यांनी सांगितले.