नंदुरबार : सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पद परीक्षेतील कथित पेपरफूट प्रकरणाचा तपास आता नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले असून संशयित अमृत पाटील, गौरव पाटील यांच्या घरांसह कौटिल्य अकॅडमीची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नंदुरबार काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. त्यास नवीन कारण ठरले एमपीएससी पेपरफूट प्रकरणाचे. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबारमध्ये येऊन संबंधित ठिकाणी तपासणी केली. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्या घराची तसेच अकॅडमीच्या परिसराचीही पोलिसांनी तपासणी केली. या कारवाईदरम्यान अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे देखील पोलिसांच्या पथकाबरोबर उपस्थित असल्याचे आढळून आले.
एमपीएससीमार्फत २२ मार्च रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील प्रश्नफुटीच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांसह नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि अन्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कशी बाहेर आली, तिची माहिती कोणाकोणापर्यंत पोहोचली, आणि या संपूर्ण प्रकरणात नंदुरबारमधील संबंधितांची भूमिका काय होती, याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. झाडाझडतीदरम्यान पोलिसांनी नेमके कोणते साहित्य अथवा कागदपत्रे ताब्यात घेतली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. या कारवाईमुळे एमपीएससी पेपरफूट प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
