नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षकपद परीक्षेतील पेपरफूट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ऋतुजा पाटील हिला नंदुरबार येथील घरातून अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर तिला मुंबईला नेण्यात आले आहे. ऋतुजाच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या सात झाली आहे.
पेपरफूट प्रकरणाच्या तपासासाठी सहा दिवसात मुंबई गुन्हे शाखेचे पथक तीन वेळा नंदुरबारमध्ये आले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात जणांपैकी तीन जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अधिकारी असल्याचे तपासात उघड झाले असून, अन्य संशयित नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.
ऋतुजा पाटील आणि तिचा मित्र गौरव पाटील यांच्यातील भ्रमणध्वनी संदेशातून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. या परीक्षेत ऋतुजाने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. मात्र, गौरव पाटील अनुत्तीर्ण झाला. दोघांमधील संबंध बिघडल्यानंतर गौरवने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पेपरफुटीबाबत तक्रार केली. त्यानंतर त्याने या प्रकरणात आपली भूमिका बदलल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि डिजिटल संवादाच्या आधारे तपास पुढे नेला. या प्रकरणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेला गोपाल मराठे नंदुरबार तालुक्यातील दहिंदूले गावचा रहिवासी असून, तो कौटिल्य अकॅडमीचा विद्यार्थी आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेकडून नंदुरबारमध्ये सखोल तपास केला जात आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा पेपरफुटी प्रकरणाशी वारंवार संबंध उघड होत असल्याने या प्रकरणाच्या तपासात नंदुरबार सध्या महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
या प्रकरणात सुरुवातीला कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अमृत पाटील आणि ऋतुजा पाटील यांना घेऊन तपास पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगाने यापूर्वीही अशाच प्रकारे परीक्षा पेपर किंवा गोपनीय माहिती बाहेर गेली होती का, इतर कोणत्या परीक्षा किंवा भरती प्रक्रियेत अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
संपत्ती व्यवहाराचाही तपास ?
गोपाल मराठे यांनी अलीकडच्या काळात काही मालमत्ता खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या व्यवहारांचा पेपरफुटी प्रकरणाशी काही आर्थिक संबंध आहे का, कथित गैरप्रकारातून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी झाला आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारमध्ये वारंवार दाखल होत असले तरी तपासातील बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यास पथकाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पथक नेमकी कोणत्या दिशेने चौकशी करत आहे, कोणाकडून काय माहिती घेतली जात आहे आणि कोणते पुरावे हाती लागले आहेत, याबाबत अधिकृत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
