नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई गुन्हे शाखेचे तपास पथक सहा दिवसांत तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले असून यावेळी प्रकरणातील इतर संशयितांना बरोबर आणून चौकशी केली जात आहे.
या प्रकरणातील संशयितांच्या चौकशीबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेले गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगानेही तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. गोपाल मराठे हे मूळचे नंदुरबारचे रहिवासी असून, ज्या कौटिल्य अकॅडमीमार्फत पेपरफुटी झाल्याचा आरोप प्रकरणात करण्यात आला आहे, त्याच अकॅडमीचे ते माजी विद्यार्थी असल्याची माहितीही समोर आली आहे.
पेपरफुटी प्रकरणात गोपाल मराठे यांचा सहभाग समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयोगातील त्यांची भूमिका, पेपरशी संबंधित माहितीपर्यंत त्यांना असलेला संभाव्य प्रवेश आणि इतर संशयितांशी त्यांचे असलेले संबंध, याबाबत तपास पथकाकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात सुरुवातीला कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अमृत पाटील यांना घेऊन तपास पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले. आता पुन्हा काही संशयितांना बरोबर घेऊन मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारमध्ये दाखल झाल्याने तपासाची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे.
गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगाने यापूर्वीही अशाच प्रकारे परीक्षा पेपर किंवा गोपनीय माहिती बाहेर गेली होती का, इतर कोणत्या परीक्षा किंवा भरती प्रक्रियेत अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
संपत्ती व्यवहाराचाही तपास ?
गोपाल मराठे यांनी अलीकडच्या काळात काही मालमत्ता खरेदी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या व्यवहारांचा पेपरफुटी प्रकरणाशी काही आर्थिक संबंध आहे का, कथित गैरप्रकारातून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी झाला आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारमध्ये वारंवार दाखल होत असले तरी तपासातील बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यास पथकाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पथक नेमकी कोणत्या दिशेने चौकशी करत आहे, कोणाकडून काय माहिती घेतली जात आहे आणि कोणते पुरावे हाती लागले आहेत, याबाबत अधिकृत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
