मालेगाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल लागून दीड महिना उलटला तरी, निरीक्षण अधिकारी (पुरवठा) या पदासाठी निवड झालेल्या ७६ उमेदवारांची शिफारस पत्रे अद्याप प्रलंबित आहेत. इतर सर्व संवर्गातील उमेदवारांना शिफारस पत्रे मिळून त्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली असताना, पुरवठा विभागाच्या उमेदवारांना मात्र अजूनही प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यसेवा परीक्षा ही बहुविभागीय स्वरूपाची असल्याने विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते. आयोगातर्फे या परीक्षेची अंतिम निवड यादी ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पासून इतर सर्व विभागांच्या उमेदवारांसाठी नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार उपजिल्हाधिकारी, सहाय्यक राज्य कर आयुक्त, पोलीस उपअधीक्षक,गटविकास अधिकारी अशा १८ संवर्गातील ३८७ उमेदवारांची शिफारस झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, निरीक्षण अधिकारी (पुरवठा) या संवर्गातील ७६ उमेदवारांची शिफारस पत्रे आयोगाकडून संबंधित विभागाला पाठवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणी आणि पर्यायाने नियुक्ती रखडली आहे.
ढिसाळ’ नियोजनाचा हा फटका?
भरती प्रक्रियेला जवळपास अडीच वर्षे लोटल्याने आणि अनेक अग्निदिव्य पार पाडूनही प्रत्यक्ष नियुक्तीला कमालीचा विलंब होत आहे. या प्रशासकीय दिरंगाईमुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. या विलंबाविरोधात आक्रमक झालेल्या संबंधित उमेदवारांनी अखेर एमपीएससीला निवेदन सादर केले आहे. सर्व संवर्गातील उमेदवारांना समान न्याय मिळावा आणि आमची शिफारस पत्रे तात्काळ निर्गमित करावीत, अशी मागणी या उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लांबलचक प्रवासाचा शेवट कधी?
२९ डिसेंबर २०२३ रोजी राज्यसेवा २०२४ परीक्षेची जाहिरात आली होती. त्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखती असे सर्व टप्पे पार पाडून तब्बल अडीच वर्षांनंतर उमेदवारांची अंतिम निवड झाली. एवढा संघर्ष करूनही नियुक्ती रखडल्याने उमेदवारांचा हा एकप्रकारे मानसिक छळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२४ रोजी पूर्व परीक्षा पार पडली. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर १७ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुलाखतीचे टप्पे पार पडले. यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली, तर ८ एप्रिल २०२६ रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम निवड यादीच्या अनुषंगाने ३० एप्रिल २०२६ पासून अन्य १८ संवर्गातील पदांची नियुक्ती प्रक्रिया वेगाने सुरू झाली असली, तरी पुरवठा निरीक्षण अधिकारी पदाच्या उमेदवारांची शिफारस मात्र अद्याप रखडलेलीच आहे. त्यामुळे या पदांच्या नियुक्तीला कधी मुहूर्त लागेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.
