मालेगाव : ​महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर होऊन चार महिने उलटले तरी, पुरवठा निरीक्षण अधिकारी (गट-ब) पदासाठी निवड झालेल्या ७६ उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया अद्याप लटकलेलीच आहे. एकाच परीक्षेतून निवड झालेल्या इतर संवर्गातील सुमारे ४०० उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले. मात्र, पुरवठा विभागाच्या ढिम्म कारभारामुळे या ७६ भावी अधिकाऱ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

​महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ८ एप्रिल २०२६ रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ७६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध केली होती. आयोग स्तरावरील निवड प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल चार महिने उलटले तरीही संबंधित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून उमेदवारांना रुजू होण्याबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळत नसल्याबद्दल उमेदवारांकडून तक्रारीचा सूर लावला जात आहे.

​ स्वतंत्र विभागीय प्रशिक्षणाचा फटका?

​राज्यसेवेतील इतर पदांसाठी संयुक्त प्रबोधन प्रशिक्षण कार्यक्रम लागू असतो. मात्र, पुरवठा निरीक्षण अधिकारी या पदासाठी संबंधित विभागामार्फत स्वतंत्र विभागीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. याच विभागीय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात प्रशासकीय स्तरावर दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांनी वारंवार अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संपर्क साधूनही त्यांना कोणतीही निश्चित तारीख किंवा स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याची तक्रार संबंधित उमेदवार करीत आहेत.

आधी आयोगाचा विलंब,आता..

​राज्यसेवा परीक्षा ही बहुविभागीय स्वरूपाची असल्याने विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते. आयोगातर्फे या परीक्षेची अंतिम निवड यादी ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल २०२६ पासून इतर सर्व विभागांच्या उमेदवारांसाठी नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार उपजिल्हाधिकारी, सहाय्यक राज्य कर आयुक्त, पोलीस उपअधीक्षक,गटविकास अधिकारी अशा १८ संवर्गातील उमेदवारांची शिफारस झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया तातडीने सुरू झाली होती. मात्र, निरीक्षण अधिकारी (पुरवठा) या संवर्गातील ७६ उमेदवारांची शिफारस पत्रे आयोगाकडून दिड ते दोन महिने विलंबाने पाठवण्यात आली होती. त्यानंतर शिफारस यादीनुसार नियुक्ती व प्रशिक्षणासाठी आता पुरवठा विभागाकडून विलंब लावण्यात येत असल्याने उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे.

‘हा’ प्रवास किती लांबणार?

​२९ डिसेंबर २०२३ रोजी राज्यसेवा २०२४ परीक्षेची जाहिरात आली होती. त्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखती असे सर्व टप्पे पार पाडून तब्बल अडीच वर्षांनंतर उमेदवारांची अंतिम निवड झाली. एवढा संघर्ष करूनही आता प्रशिक्षण व नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे या पदांच्या नियुक्तीला कधी मुहूर्त लागेल असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.