जळगाव: खान्देशातील धुळ्यात एका मराठी कुटुंबात जन्म झालेली अभिनेत्री मृणाल ठाकूर हिंदी तसेच साऊथ इंडस्ट्रीत अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. मृणाल हिंदीसह मराठी, त्यातल्या त्यात अहिराणी भाषा खूप चांगली बोलते. नुकतेच मुंबईतील एका चित्रपटाच्या इव्हेंट दरम्यान तिला जळगावच्या एका पत्रकार तरूणीने तुले खावाले काय आवडस म्हणून अहिराणीत विचारले. तर माले घोटेल वांगानी भाजी, वरण बट्टी आन् एखादं बट्ट खावाले आवडस, असे उत्तर तिने दिले.
मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी ‘दो दिवाने सहर मै’ या सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा समोर उपस्थित असलेल्या मूळ जळगावमधील एका पत्रकार तरूणीने मृणाल ठाकुरशी थेट अहिराणी भाषेत संवाद साधला. पत्रकारांसमोर बोलताना मृणाल सुद्धा सराईतपणे अहिराणी भाषेत बोलली. या दरम्यान, आपल्याला खान्देशात प्रसिद्ध असलेली घोटलेली वांग्याची भाजी, सोबत वरण-बट्टी तसेच एखादं भाजीचं बट्ट म्हणजे रस्सा खायला आवडत असल्याचे तिने आवर्जून सांगितले. अहिराणी भाषेचा अभिमान असल्याने एरवी मृणाल जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती अहिराणी भाषेत तयार केलेले व्हिडीओ समाज माध्यमावर टाकते. तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.
दूरदर्शनवरील मालिकांपासून ते बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. अभिनय, सौंदर्य आणि साधेपणाच्या जोरावर मृणालने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मृणालने मनोरंजन विश्वात पदार्पण केले ते ‘मुझसे कुछ कहती… ये खामोशियां’ या मालिकेतून. या मालिकेमुळे तिला छोट्या पडद्यावर ओळख मिळाली असली, तरी झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मुळे तिच्या लोकप्रियतेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली. आणि टीव्हीवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
टेलिव्हिजन विश्व गाजवल्यानंतर मृणालने पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूडमध्ये तिने ‘सुपर ३०’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केले. या चित्रपटात तिने सुपरस्टार हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती. साधी, भावनिक आणि प्रभावी भूमिका साकारत मृणालने प्रेक्षकांसह समीक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. यानंतर तिला एकामागून एक महत्त्वाच्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. नुकतीच ती अजय देवगनसोबत ‘सन ऑफ सरदार’च्या रिमेकमध्ये झळकली. या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा आपली व्यावसायिक ताकद सिद्ध केली आहे. बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत असतानाच मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही यशस्वी पाऊल टाकले. तिथेही तिच्या अभिनयाला चांगली दाद मिळत असून, वेगवेगळ्या भाषांतील भूमिका साकारत तिने आपली अष्टपैलू प्रतिभा दाखवून दिली आहे.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही मृणालचे मराठी आणि अहिराणी भाषांशी असलेले घट्ट नाते आजही कायम आहे. विविध मुलाखतींमधून ती आपल्या मूळ संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल अभिमानाने बोलताना दिसते. समाज माध्यमावरही ती अनेकदा मराठी आणि अहिराणीतून संवाद साधते, जे तिच्या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरते. टीव्ही, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, असा बहुआयामी प्रवास करत असताना मृणाल ठाकूरने मेहनत, सातत्य आणि जमिनीशी नाळ जोडून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

