नाशिक – पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करणारे नाशिक शहर काही महिन्यांपासून लैंगिक शोषण, फसवणूक, धर्मांतरासाठी दबाव, नीट पेपरफूट अशा कारणांमुळे गाजत आहे. या सर्व प्रकरणांची तपासणी वेगवेगळ्या स्तरावर सुरु असताना अजून एक विनयभंगाचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून हा प्रकार घडला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात हा संतापजनक प्रकार घडला आहे. नाशिकच्या एन. डी. पटेल रोडवर राज्य परिवहन महामंडळाचे आगार क्रमांक एक आहे. या आगारात वेगवेगळ्या शाखा आहेत. आगारात अनेक महिला कर्मचारीही कार्यरत आहेत. याच आगारात सहायक वाहतूक अधीक्षक म्हणून विजय निकम (४५, रा. ओझर, नाशिक) नियुक्त आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३६ वर्षाची विवाहित महिलाही या आगारातंर्गत काम करते. या महिलेने निकमविरोधात तक्रार दिली आहे. एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६ या कालावधीत निकमने आपल्याला त्रास दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार ६ मे रोजी संध्याकाळी पीडिता कामावर असताना संशयित विजय निकमने पीडितेचा पाठलाग केला. तिच्या कक्षाजवळ आला. “ तू गाडीत बस, एक चक्कर मारून येऊ, मला तुझ्याशी बोलायचे आहे.”, असे निकम तिला म्हणाला. पीडित महिलेने त्याचा हेतू ओळखून त्यास नकार दिला. त्यानंतर निकम गाडीतून खाली उतरला. तो जबरदस्तीने महिलेला चॉकलेट देऊ लागला. महिलेने चिडून पुन्हा नकार दिल्यावर त्याने तिचा हात पकडला. “ माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी वेळ काढून माझ्या घरी ये “, असे तो म्हणाला. अश्लील भाषेत त्याने महिलेकडे प्रेम करण्याची गळ घातली. त्यामुळे महिला घाबरली.

विजय निकमकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित विजय निकम हा आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने गायब झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.

दरम्यान, नाशिक शहरात सातत्याने असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक असलेल्या नाशिकमध्ये लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव असे प्रकार घडणे योग्य नाहीत. नाशिकची धार्मिक नगरी ही ओळख टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे. महिलांना छळणाऱ्या, महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.