नाशिक – राज्यातील वैद्यकीय शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०२६-२०२७ वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकूण उत्पन्न तब्बल ६१३.३७ कोटी तर एकत्रित खर्च ६१४.४७ कोटी इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट १.१० कोटींची राहण्याचा अनुमान आहे.
आरोग्य विद्यापीठाची २०२६ वर्षातील पहिली अधिसभा बैठक कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. यावेळी आरोग्य विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला.
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात १९.६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धन्वंतरी विद्याधन, बहिःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका, संजीवनी विद्यार्थी सुरक्षा, राणी लक्ष्मीबाई निर्भया अभियान, महात्मा ज्योतीराव फुले शिष्यवृत्ती योजना आदींचा समावेश आहे. मानसिक तणावामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात.
अभ्यास कसा करावा, याबाबत शिक्षकांनी प्रभावीपणे तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी करणे व समुपदेशन व्हावे यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व समुपदेशन शीर्षांतर्गत अर्थसंकल्पात ६० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.
संशोधनास प्रेरणा मिळावी, यासाठी महाविद्यालय स्तरावर संशोधन पुस्तकांसाठी दीड कोटी, प्रशिक्षण व कार्यशाळेच्या आयोजनासाठी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली. नागपूर, कोल्हापूर येथे जागा खरेदी करून विद्यापीठाचे स्वतःच्या जागेत बांधकाम करून विभागीय केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अर्थसंकल्पात ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी निधीची तजवीज आहे. विद्यापीठात कार्यान्वित आरोग्य केंद्रासाठी ६३ लाख, कर्मचारी कल्याणकारी योजनांसाठी १.२१ कोटी व नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या इक्षणा संग्रहालयासाठी तरतूद, संशोधन प्रकल्पासाठी २४ लाख, आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी साडेतीन कोटी, उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम सव्वा कोटी, एआय आधारित ब्लॉकचेन तंत्रज्ञान ५० लाख आदींची तरतूद करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
यावेळी कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी विद्यापीठाचा अर्थसंकल्प उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करणारा असून त्यात संशोधनाला प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. अधिसभेत सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. वाय. प्रवीणकुमार, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. चेतना गोरीवाले, डॉ. संतोष गटणे आदी उपस्थित होते.

