धुळे : मुंबई–आग्रा या देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-३) सहापदरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला असून, धुळे जिल्ह्यात हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेषतः सोनगीर ते नरडाणा या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री तैनात करण्यात आली असून, महामार्गाचे रूप पालटण्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकल्पामुळे दीर्घकाळापासून प्रवाशांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

मुंबई–आग्रा महामार्ग हा महाराष्ट्रासह मध्य भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहने, मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक होत असल्याने गेल्या काही वर्षांत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यातूनच सहापदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. धुळे जिल्ह्यातील सोनगीर आणि नरडाणा परिसर औद्योगिक व व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याने या भागात कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

विविध कामांसाठी यंत्रे दाखल

सध्या या टप्प्यावर मोठ्या मोऱ्या, बॉक्स कल्व्हर्ट, लहान पूल तसेच आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलांची कामेही होऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी शक्य तेथे पाईप टाकणे किंवा नाल्यांची रुंदी वाढविणे आणि आधुनिक पद्धतीने मोऱ्या उभारण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच नवीन पदरांसाठी आवश्यक असलेला भराव, मुरूम टाकणे, सपाटीकरण आणि मजबुतीकरणाची कामेही काही ठिकाणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. हायड्रोलिक एक्सकॅव्हेटर, आधुनिक पेव्हर मशिन्स, रोलर आणि काँक्रीट मिक्सरच्या साहाय्याने कामे दिवस-रात्र सुरू आहेत.

महामार्गावरील काम सुरू असताना वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा, यासाठी पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स ठेवण्यात आले असून आवश्यक तेथे सुरक्षा रक्षक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रणावर विशेष लक्ष दिले जात असून, वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन करण्यात येत आहे.

उत्तर भारताकडे वेगवान वाहतूक

सहापदरीकरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते इंदूर, आग्रा तसेच उत्तर भारताकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. वेळेची मोठी बचत होण्यासोबतच अपघातांचे प्रमाणही घटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नरडाणा एमआयडीसी, सोनगीर व परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा आणि कृषी मालवाहतुकीला या महामार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून या कामाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र कामकाजादरम्यान धूळ, आवाज आणि काही ठिकाणी होणाऱ्या तात्पुरत्या वाहतूक बदलांमुळे गैरसोयीही सहन कराव्या लागत असल्याचे मत यावेळी काही नागरिकांनी मांडले. प्रशासनाने या बाबींची दखल घेत, धूळ नियंत्रणासाठी पाण्याचे फवारे, नियमित साफसफाई आणि वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना कंत्राटदारांना द्याव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली तर विकासकामांसोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेकडे व सोयींकडेही लक्ष दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.