नाशिक – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ५ ऑगस्ट रोजी मुंबई ते दानापूरदरम्यान एकमार्गी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक ०१०८१ ही ५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता दानापूर येथे पोहोचणार आहे. मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे नाशिक, इगतपुरी, मनमाड आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना या स्थानकांवरूनच गाडीत प्रवास करता येईल.

या विशेष गाडीत १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे तसेच २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी एकूण रचना ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध राहील.

आरक्षण कधीपासून?

या विशेष गाडीचे आरक्षण ३ ऑगस्टपासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट उपलब्ध होईल. तसेच ‘रेल वन’ ॲपद्वारेही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गाडीच्या सर्व स्थानकांवरील आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांची माहिती एनटीईएस ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या बाबतची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना लाभ

मुंबई ते दानापूरदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेला इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड व भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ होणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.