जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हजरत निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने ‘मिशन रफ्तार’ साकारत भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर धावणारी राजधानी एक्स्प्रेस भारतातील पहिली लांब पल्ल्याची गाडी ठरली असून, या नव्या प्रणालीमुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

पुश-पुल प्रणालीमध्ये रेल्वे गाडीच्या पुढील आणि मागील अशा दोन्ही टोकांना शक्तिशाली इंजिन जोडले जातात. पैकी पुढील इंजिन रेल्वे गाडी पुढे खेचते, तर मागील इंजिन मागून गती देण्याचे काम करते. या दुहेरी इंजिनच्या समन्वयामुळे रेल्वे गाडीला अधिक वेग मिळतो. आणि चढ-उतार असलेल्या घाट विभागातही गाडी सुरळीतपणे तसेच समतोल वेगाने धावू शकते. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा घाटातून गाडी जाताना होत असतो. आतापर्यंत अशा भागात बँकर इंजिन जोडणे किंवा वेगळे करणे आवश्यक होते, ज्यामुळे वेळेचा अपव्यय होत असे. पुश-पुल प्रणालीमुळे ही गरज पूर्णपणे संपुष्टात आली असून, मौल्यवान वेळेची बचत होत आहे. परिणामी राजधानी एक्स्प्रेसचा एकूण प्रवासाचा कालावधी आणखी कमी होण्यास मदत होत आहे.

देशाच्या राजधानीशी जलद संपर्क

‘मिशन रफ्तार’ अंतर्गत भारतीय रेल्वेने गाड्यांचा वेग वाढविणे, प्रवास अधिक कार्यक्षम करणे आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दिशेने मध्य रेल्वेची राजधानी एक्सप्रेस एक आदर्श उदाहरण ठरत असून, भविष्यात इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुद्धा ही प्रणाली लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे मध्य रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडली असून, प्रवाशांना कमी वेळेत अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. राजधानी एक्स्प्रेसच्या सेवेचा मुंबई व उपनगरीय परिसरातील प्रवाशांसह नाशिक, जळगाव आणि भुसावळ विभागातील प्रवाशांना मोठा लाभ झाला असून, देशाच्या राजधानीशी अधिक जलद आणि सुलभ संपर्क उपलब्ध झाला आहे. राजधानी एक्स्प्रेस भारतीय रेल्वेच्या प्रगतीचे प्रतीक असून, प्रवाशांना वेगासह आराम आणि विश्वासार्हता प्रदान करत कार्यक्षम संचालनात नवे मापदंड प्रस्थापित करते.

असे आहे राजधानीचे वेळापत्रक

राजधानी एक्स्प्रेस सध्या दररोज दुपारी ०४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून सुटते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५५ वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथे पोहोचते. या प्रवासादरम्यान राजधानी एक्स्प्रेस कल्याणसह नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, भोपाळ, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर आणि आग्रा कॅन्ट या स्थानकांवर थांबते. परतीच्या प्रवासात ही गाडी दररोज दुपारी ०४.५५ वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते.