जळगाव : मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील प्रवाशांसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या मागणीला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सीएसएमटी–नागपूर द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आणि सीएसएमटी–नागपूर वातानुकूलित विशेष एक्स्प्रेस, अशा दोन गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे (ZRUCC) सदस्य महेंद्रकुमार बुरड आणि पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे (DRUCC) सदस्य महेंद्र कोठारी यांनी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक अरविंद माळखेडे आणि मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्याशी प्रस्तावित रेल्वेगाड्यांबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई–नागपूर मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध रेल्वेसेवेवरील ताण लक्षात घेता दोन स्वतंत्र विशेष गाड्या सुरू करण्याची आवश्यकता अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यामध्ये नियमित प्रवासासाठी द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस, तर वातानुकूलित प्रवासासाठी स्वतंत्र विशेष गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
चार प्रमुख स्थानकांवर थांब्यांची मागणी
प्रस्तावित रेल्वेगाड्यांचा लाभ केवळ मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या प्रमुख शहरांनाच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही मिळावा, यासाठी चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि मलकापूर या स्थानकांवर थांबे देण्याची मागणी करण्यात आली. या स्थानकांवर थांबे मिळाल्यास जळगाव जिल्ह्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई आणि नागपूरकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच इतर प्रवाशांची संख्या लक्षात घेता या गाड्या सुरू झाल्यास प्रवासाची सोय अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंत्री, खासदार, आमदारांचा पाठपुरावा
सीएसएमटी–नागपूर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ आणि आमदार चैनसुख संचेती यांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींच्या स्तरावरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनीही पुढे नेले आहे.
निर्णयाकडे प्रवाशांचे लक्ष
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांची मुंबई–नागपूर मार्गावरील वाढती गरज लक्षात घेऊन या दोन विशेष रेल्वेगाड्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने भविष्यात या रेल्वेसेवा सुरू होण्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, गाड्यांच्या प्रत्यक्ष प्रारंभाची तारीख, वेळापत्रक आणि थांब्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश मिळते का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
