नाशिक – मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तांत्रिक कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएमएसटी) -हुजूरसाहेब नांदेड दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह इतर काही महत्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात महत्वपूर्ण सुधारणा केली आहे. हे नवीन वेळापत्रक ३ मे २०२६ पासून लागू होणार आहे. वंदे भारतच्या सुधारीत वेळापत्रकानुसार चार स्थानकांवर गाडीचे आगमन आणि प्रस्थानच्या वेळेत बदल झाला असला तरी चार रेल्वे स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रारंभी मुंबई-जालना मार्गावर असणाऱ्या या वंदे भारत रेल्वेगाडीचा गतवर्षी नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला. नांदेड आणि मुंबईला जोडणारी ही एक प्रमुख जलद रेल्वे आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस धावते (नांदेडहून बुधवार वगळून आणि मुंबईहून गुरुवार वगळता). सुमारे ६१० किलोमीटरचे अंतर नऊ ते दहा तासांत पार करते, ज्यामुळे नांदेड आणि मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणियरित्या कमी झाला आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी जिल्हे थेट मुंबईशी वेगवान सेवेने जोडले गेले आहेत. मार्गातील अन्य जिल्ह्यांनाही तिचा लाभ होत आहे. मध्य रेल्वेने या वंदे भारत गाडीच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. हे सुधारित वेळापत्रक तीन मे २०२६ पासून लागू होईल.
गाडी क्रमांक २०७०६ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नांदेड) आता मुंबईतून सकाळी १३:१० ऐवजी १३:१५ वाजता सुटेल. दादरला ही गाडी १३:२० वाजता पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी १८:४३ ला पोहोचून १८:४५ ला सुटेल. जालना येथे १९:१८ ला आगमन होऊन १९:२० ला प्रस्थान करेल. परभणी येथे रात्री २१:१३ ला पोहोचून २१:१५ ला सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे ही गाडी रात्री २२:२५ ला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक २०७०५ (नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सकाळी ०५:०० ऐवजी ०५:२० वाजता नांदेडवरून सुटेल. ही गाडी परभणीला ०५:५८, जालन्याला ०७:३३ आणि छत्रपती संभाजीनगरला ०८:२३ वाजता पोहोचेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी १४:१५ वाजता पोहोचेल. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण, नाशिक रोड आणि मनमाड येथील वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्थानकांवर आधीच्या वेळेनुसार गाड्यांचे आगमन आणि प्रस्थान होईल.
इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही सुधारणा
वंदे भारत व्यतिरिक्त गाडी क्र. १२१४२ (पाटलीपुत्र – एलटीटी) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी १४:१० ऐवजी १४:२० वाजता पोहोचेल. गाडी क्र. २२१८० (एम.जी. रामचंद्रन चेन्नई – एलटीटी) ही गाडी आता दुपारी १४:२५ ऐवजी १४:३० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ११०१२ (धुळे – सीएमएसटी ही गाडी मुंबईत दुपारी १४:१५ ऐवजी १४:२५ वाजता दाखल होईल. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांंनी सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. ३ मे पासून होणाऱ्या या बदलांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
