नाशिक – नाशिककरांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. मुंबई – पुणे – हैदराबाद या प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाशी नाशिकला ‘फिडर कनेक्टिव्हिटी’द्वारे जोडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या ९० ते १२० मिनिटांत गाठता येतील.
या संदर्भात जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) आणि ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ आयआयटी’च्या १२ सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच नाशिक महानगरपालिकेत येऊन चाचपणी केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ‘जायका’च्या वतीने मिस्टर कझुशिरो होरिजोवा, मोटोकोह्यू शिमुरा यांच्यासह इतर तज्ज्ञांनी नाशिकच्या विकासाचा आराखडा २०५१, ‘अभिनव उपक्रम’ आणि पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणावर मंथन केले. या बैठकीला महापालिका आयुक्त अनुपस्थित राहिल्याने महत्त्वपूर्ण विषयावर त्वरित शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
जपानच्या शिष्टमंडळाने रेल्वेच्या नव्या पर्यायाची चाचपणी केली. या संदर्भात बुलेट ट्रेन नाशिकला जोडण्याचा मार्ग प्रशासकीय पातळीवर सुकर होईल असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी म्हटले आहे. या माध्यमातून दळणवळणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘फिडर कनेक्टिव्हिटी’चे तंत्र काय?
बुलेट ट्रेनचा मुख्य मार्ग शहरातून जात नसला तरी मुख्य स्टेशनवरून शहरांना जोडण्यासाठी सेमी-हायस्पीड किंवा विशेष जलद रेल्वे मार्ग तयार केला जातो, त्याला ‘फिडर कनेक्टिव्हिटी’ म्हणतात. मुंबई-पुणे-हैदराबाद मार्ग पुण्यावरून जात असल्याने, नाशिक ते पुणे अशी वेगवान कनेक्टिव्हिटी देऊन प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याचा हा प्रस्ताव आहे.
महा-लॉजिस्टिक हबच्या दिशेने वाटचाल…
या हायस्पीड कॉरिडॉरमुळे सातपूर, अंबड, सिन्नर या औद्योगिक वसाहतींमधील उत्पादनांना थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच नाशिकची द्राक्षे, कांदा आणि वाईन टुरिझमला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी गती मिळेल. समृद्धी महामार्ग, प्रस्तावित ग्रीन फील्ड महामार्ग आणि विमानसेवेनंतर आता बुलेट ट्रेनची जोड मिळाल्यास नाशिक हे महाराष्ट्राचे प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वर आणि धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या देशभरातील भाविकांचा प्रवासही यामुळे सुसाट होणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद अधिक जवळ येतील. प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होऊन पैशांची बचत होणार आहे.
