नाशिक -रविवारी पार पडलेली २१ वी टाटा मुंबई मॅरेथॉन नाशिकसाठी एका वेगळ्याच प्रकारे जुळली गेली. या मॅरेथाॅनमध्ये नाशिकने एका वेगळ्याच विक्रमाची नोंद केली. विक्रमी ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतलेल्या यंदाच्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये नेहमीप्रमाणे विदेशी खेळाडूंचा दबदबा राहिला. परंतु, भारतीयांच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
२००४ पासून जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉन होत असते. जगातील अनेक धावपटूंचा सहभाग हे या मॅरेथाॅनचे वैशिष्ट्ये राहिले आहे. पुरुषांच्या एलिट गटात इथिओपियाच्या ताडू अबाटे डेमे याने ४२ किमीचे अंतर २ तास ९ मिनिटे ५५ सेकंद या वेळेत पूर्ण करुन प्रथम क्रमांक मिळविला. भारतीय धावपटूंमध्ये मूळच्या बोरिवलीच्या २८ वर्षीय डाॅ. कार्तिक करकेराने २ तास १९ मिनिटे ५५ सेकंद इतकी वेळ नोंदवत ४२ किलोमीटर अंतर कापले. त्याने भारतीयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. बक्षिस म्हणून त्याला पाच लाख रुपये देण्यात आले.
महिलांमध्ये भारतीयात नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधवने २ तास ४९ मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. संजीवनीने प्रथमच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. एलिट गटात ती एकंदर १० व्या स्थानी राहिली. संजीवनीलाही बक्षीस स्वरुपात पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सीएसएमटी-हुतात्मा चौक-चर्चगेट-मरिन ड्राइव्ह-पेडर रोड-हाजी अली-वांद्रे वरळी सी-लिंक- माहीम- प्रभादेवी-हाजी अली ते सीएसएमटी असा या मॅरेथाॅनचा मार्ग होता. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला होता.
प्रथमच मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नाशिकच्या संजीवनीन जाधवने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत ३३ मिनिटे ३३.४७ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्ण पदक होते. यापूर्वी तिने याच क्रीडा प्रकारात एक रौप्य आणि एक सुवर्णपदक जिंकले आहे. संजीवनी ही नाशिक येथे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ३ ते ४ तास सराव करते. संजीवनी सध्या येवला येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
संजीवनीने याआधी सप्टेंबर २०१७ मध्ये तुर्कस्थानात झालेल्या एशियन इनडोअर १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य, एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेत १० हजार मीटर धावण्यात दोन वेळा कांस्य, वर्ल्ड युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत ५ हजार मीटर धावण्यात रौप्यपदक अशी कमाई केली आहे. आंतररराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनंतर संजीवनी जाधव ही नाशिकची सर्वात यशस्वी धावपटू आहे.
मुंबईत झालेली टाटा मॅरेथाॅन नाशिकसाठी खास ठरली. या मॅरेथाॅनमध्ये भारतीयांमध्ये पुरुष आणि महिला गटात पहिल्या आलेल्या दोघांचा नाशिकशी खास संबंध आहे. संजीवनी जाधव तर नाशिकचीच आहे. मूळचा बोरिवलीचा असलेला डाॅ. कार्तिक करकेरा हा सध्या नाशिक येथेच स्थायिक आहे. नाशिकच्या डाॅ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तो अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. २०२५ मध्ये नाशिक येथे झालेल्या मविप्र मॅरेथाॅनचे विजेतेपद डाॅ. कार्तिक करकेराने मिळविले होते. याशिवाय मूळची गुजरातची असणाऱ्या आणि मुंबई मॅरेथाॅनमध्ये संजीवनीनंतर रौप्यपदक मिळविणारी निर्माबेन ठाकोर ही चार वर्षांपासून नाशिक येथे सराव करीत आहे. ती नाशिकच्या एकलव्य ॲथलेटिक्स ॲण्ड स्पोर्टस इन्स्टिट्यूटची खेळाडू आहे. संजीवनी आणि निर्माबेनचे प्रशिक्षक विजेंदर सिंग हे आहेत.
