नाशिक : गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमात शहरात दोन लाख पाच हजार ८५४ मूर्तीचे संकलन करण्यात आले. तसेच सुमारे १७५ मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्ती संकलनात साडेपाच हजारहून अधिक वाढ झाली.

गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका दरवर्षी विभागनिहाय ठिकठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन करते. विसर्जनासाठी शहरात २९ नैसर्गिक स्थळे तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पाच ठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम अशी एकत्रित विसर्जनाची व्यवस्था होती. नाशिकरोड विभागात फिरत्या तलावाव्दारे मूर्ती संकलनाचे नियोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनार्थ गणेशभक्तांनी मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्यास हातभार लावल्याचे मूर्ती संकलनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विसर्जनाच्या दिवशी सहा विभागातून एकूण दोन लाख पाच हजार ८५४ मूर्ती संकलित करण्यात आल्या.

हे ही वाचा…नाशिक : ध्वनिप्रदूषण नियम उल्लंघनाचे दोन गुन्हे – परवानगीविना मिरवणुकीमुळे मंडळाविरुध्द गुन्हा

विविध विसर्जन स्थळांवरून १७४.७८० मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आले. पीओपीच्या मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून महापालिकेने नागरिकांना ७२५ किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडर वितरीत केली. गतवर्षी दोन लाख २५३ मूर्ती आणि १५३.१५५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते. या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली. अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत घरीच विसर्जन केले. या उपक्रमात मनपा पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन या विभागांनी समन्वयाने काम केले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय छात्र सेना पथकातील विद्यार्थी, के. व्ही. नाईक महाविद्यालय, क. का. वाघ अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन, एनडीएमव्हीपी महाविद्यालय, संदीप फाउंडेशन, गोखले एज्युकेशन संस्था, रोटरी क्लब आदींचे योगदान लाभले.

हे ही वाचा…Sandalwood Stock Seized In Nashik : म्हसरुळ शिवारात ३५ लाखांचा चंदन साठा जप्त

विभागनिहाय संकलन

पंचवटी – ७८६७७
नवीन नाशिक – २५२६१

नाशिकरोड – ४११३८
नाशिक पूर्व – १०४२८

सातपूर -३१११९
नाशिक पश्चिम – १५२३१