जळगाव - शहरात सार्वजनिक गणेश महामंडळासह विविध लहान-मोठ्या मंडळांतर्फे गुरुवारी ढोल-ताशांच्या दणदणाटात विसर्जन मिरवणुका काढल्या जात आहेत. भिलपुरा चौक भागात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी करुन गणपतीची आरती करण्यात आली. जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षकांकडून लालशाह बाबा दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. यातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविण्यात आले आहे. ही एकतेची परंपरा ५३ वर्षांपासून शहरात सुरू आहे. हेही वाचा >>> जळगावात विसर्जन मिरवणुकांना जल्लोषात प्रारंभ, रांगेतील वादातून हाणामारी शहरातील भिलपुरा भागातील सय्यद नियाज अली यांनी १९७० मध्ये हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये कायम सलोखा राहावा, एकतेची भावना जागृत व्हावी, यादृष्टीने रथोत्सव व गणेशोत्सवात मुस्लीम बांधवांनी सहभाग घेण्याची परंपरा सुरू केली होती. भिलपुरा चौक भागातून जाणार्या रथावरही मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी केली जाते. याच मार्गावरून गणेश मंडळांच्या मिरवणुकांवरही अशीच पुष्पवृष्टी करीत आरतीही केली जाते. हिंदू बांधवांकडूनही लालशाह बाबा दर्ग्यावर चादर चढविली जाते. गुरुवारी सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक भिलपुरा परिसरात आल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी करीत आरती करण्यात आली. हिंदू बांधवांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते हजरत पिरलाल शाह सरकार यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारी ही परंपरा आहे. ही परंपरा हिंदू-मुस्लीम बांधवांचे एकतेचे प्रतीक आहे. सर्वांनीच याची प्रेरणा घ्यावी, तसेच इतरही बांधवांनी या परंपरेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करीत त्यांनी ही परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही दिली. त्यांनी या एकतेच्या परंपरेचे व मुस्लीम बांधवांचे कौतुक केले.