नाशिक : ‘मविप्र’ समाज संस्था आणि आर्मस्ट्रॉंग मशीन यांच्यावतीने कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन डिमॅटीकचे वरिष्ठ अधिकारी ब्रेन्डन लेसी यांच्या हस्ते तर आर्मस्ट्रॉंगचे प्रमुख विनीत माजगावकर, कार्यकारी संचालक  प्रणव माजगांवकर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

करोना काळात पुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून यंत्रमानवाचा वापर वाढला असल्याचे लेसी यांनी सांगितले. यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होतो की काय अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अचूकता, गती आणि विश्वासार्हता वाढली असून विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तंत्रज्ञानासोबत जगायला शिकले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्मस्ट्रॉंगचे विनीत माजगावकर यांनी रोबोटिक्स प्रयोगशाळेच्या सहाय्याने अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त तांत्रिक गुणांना अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करून रोबोटिक्स, अ‍ॅटोमेशन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संशोधन अशा अनेक आधुनिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक प्रणव माजगांवकर यांनी  मविप्र संस्थेने रोबोटिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्याचे सांगितले.

 सरचिटणीस पवार यांनी संस्थेने रोबोटिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणात एक पाऊल पुढे टाकले असून येणाऱ्या काळात अभियांत्रिकी सोबतच केजी टू पीजी स्तरावरील विद्यार्थ्यांनाही याचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. शेवाळे यांनी विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीच्या जोरावर ज्ञान आत्मसात करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास डॉ. विश्राम निकम, सचिन पिंगळे, डॉ. प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, शिवाजी गावले, प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे, उपप्राचार्य नितीन देसले  उपस्थित होते.