लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा वाढता भार हलका करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये माझी नोंद या शीर्षकाखाली पृष्ठांचा प्रभावी वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पाठीवरचा भार हलका होईल, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.




यंदा नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा विविध उपक्रमांनी होणार आहे. विद्यार्थ्यांचा पाठीवरील भार हलका व्हावा, यासाठीही प्रयत्न होत आहे. शासन निर्णयानुसार माझी नोंद या शीर्षकाखाली पाठ्यपुस्तकांमध्येच वह्याची पाने देण्यात आली आहेत. पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पध्दतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात ही पाने देण्यात आली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माझी नोंद यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह शिक्षकांनी करू नये, विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात, महत्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी नोंद वही वापरावी, तसेच कच्चे काम, सुत्रलेखन, महत्वाचे संबोधन, गणित सोडविण्याची वेगळी रित मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे, शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द , वाकप्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ आदींसाठी उपयोग करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:चे सुलभ संदर्भ साहित्य तयार करावे, स्वत:चे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येईल, आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील. यामुळे पालकांना वर्गात काय शिकवले हे समजेल. यासाठी ही पाने उपयुक्त ठरतील.
हेही वाचा… नाशिक: संशयिताचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तकांची प्रतिक्षा कायम आहे. या उपक्रमाचे स्वागत होत असले तरी याविषयी काही साशंकता व्यक्त होत आहे. वह्याची पाने फक्त महत्वाचे मुद्दे लिहीण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सोबत विषयाची वही लागणारच आहे. यापूर्वी स्वाध्याय वह्या होत्या. तसा प्रयोग करण्याची गरज होती, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच एवढी पाने विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी अक्षर छोटे काढावे लागेल. पुस्तकाचा आकार पानांमुळे वाढला आहे. यामुळे पाने वेगळी होण्याची शंका पालकांनी व्यक्त केली आहे.