|| अविनाश पाटील

नाशिक : नगर पंचायत निवडणुकीतील विषय वेगळे असल्याने केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांनी ते समजून न घेता निव्वळ राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिल्यास मतदारांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे उत्तर महाराष्ट्रातील नऊ नगर पंचायतींच्या निकालाने दाखवून दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. हिना गावित, माजी मंत्री गिरीश महाजन या सर्वाना हाच अनुभव आला. निकालात शिवसेना चार ठिकाणी, भाजप तीन तर, राष्ट्रवादी दोन नगर पंचायतीत सर्वाधिक जागा जिंकणारे पक्ष ठरले. नऊपैकी केवळ कळवण येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे राज्यातील सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढून यशस्वी झाले. राज्याच्या इतर भागात भाजप आणि राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असले तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र शिवसेनेने या दोघांना रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
Raigad Lok Sabha
शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

शिवसेनेची राज्याच्या अन्य भागात घसरण झाली. मुख्यमंत्रीपद असतानाही शिवसेना चौथ्या क्रमाकांचा पक्ष ठरला. पण उत्तर महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला. या भागात सर्वाधिक नगरपंचायतींमध्ये शिवसेनेचे वर्चस्व बघायला मिळाले.

निवडणूक झालेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा नगरपंचायती या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यापैकी केवळ सुरगाणा आणि देवळा या ठिकाणी भाजपला यश मिळाले. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपच्या विजयात डॉ. पवार यांच्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव अधिक राहिला. सुरगाण्यात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसेच तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांचे प्रयत्न कामी आले. देवळा हा तर भाजपचा बालेकिल्ला. आ. डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदार आहेर या स्थानिकांमुळे एकहाती सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरीत महाविकास आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यात यश न आल्याने शिवसेना-काँग्रेस युती झाली. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला. पेठेत मात्र शिवसेनेच्या सत्तेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला. निफाड येथे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शहर विकास आघाडी, बसपा यांना बरोबर घेऊन बाजी मारली. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. दिलीप बनकर यांनी ही निवडणूक फारशी गांभीर्याने न घेतल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. कळवण येथे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने सहजगत्या यश मिळविले. नाशिक जिल्ह्यातील या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती मात्र फारसे काहीच लागले नाही.

साक्रीत भाजपची मुसंडी

भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी प्रचार आणि उमेदवार निवडीत दाखविलेले नियोजन आणि समन्वय साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना यश देवून गेले. ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीत रूपांतर होईपर्यंत साक्रीवर अबाधितपणे सुमारे ४० वर्षांपासून राज्य करणारे ज्ञानेश्वर नागरे यांची सत्ता गेली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह वर्षभरापूर्वीच मूळचे काँग्रेसचे असलेले ज्ञानेश्वर नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना-राष्ट्रवादीने युती करुन निवडणूक लढवली. परंतु, काँग्रेसने सवतासुभा केल्याने मतविभागणीचाही लाभ भाजपला मिळाला. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीवर वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या विजय पराडके यांनी दणदणीत विजय मिळविताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री काँग्रेसचे अ‍ॅड. के. सी. पाडवी, भाजपच्या खा. डॉ. हिना गावित, त्यांचे वडील आ. डॉ. विजयकुमार गावित यांना धक्का दिला.

बोदवडला शिवसेनेचे यश

जळगाव जिल्ह्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना धोबीपछाड देत बोदवड नगरपंचायतीत एकहाती यश मिळविले. गिरीश महाजन यांनी लक्ष घालूनही भाजपला नामुष्की पत्करावी लागली.

राष्ट्रवादी, भाजपला रोखले..

राज्याच्या इतर भागात भाजप आणि राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असले तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र शिवसेनेने या दोघांना रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे.