नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग मोजणीकरिता आलेल्या अधिकाऱ्यांवर स्थानिक गावकऱ्यांकडून दगडफेक करण्याता आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. नाशिक जवळील शिवडे सिन्नर तालुक्यात शेतकरी रस्त्यावर आले व महामार्ग मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. याठिकाणी आलेल्या महामार्ग मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी दगडफेक केली. काही आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात आज सकाळपासूनच या परिसरात वरिष्ठ सरकारी अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कल्याण तालुक्यातील राये, निंबवली गावातील सर्वेक्षणासाठी मोठ्याप्रमाणात शासनाने पोलीस बळाचा वापर करून संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना, महिलांना अटक केल्याने आंदोलकांनी राज्य शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांचा विरोध डावलून अधिकाऱ्यांनी महामार्ग मोजणी सुरु ठेवली. यामुळे शेतकरी अजून आक्रमक झाले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्ग मोजणी प्रक्रिया सुरु होती. नाशिक जिल्ह्यातील खासदार व आमदार आंदोलक शेतकऱ्यांची कोणतीही दखल घेत नसल्याने  आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधातही घोषणा दिल्या.

मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या महामार्गासाठी सरकारने भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केला.