धुळे : नागपूर – सुरत महामार्गावर फागणे (ता. धुळे) गावाजवळ गुरुवारी (दि. ११) सायंकाळी बुलेट दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये दीपक मोतीलाल भामरे (४३, रा. स्मिट कॉलेजजवळ, जळगाव) व पन्नालाल भगवानदास वर्मा (५८, रा. जयकिसानवाडी, जळगाव) यांचा समावेश आहे. बुलेट (क्र. एमएच १९/ईटी १७२६) जळगावहून धुळ्याकडे येत असताना समोरून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की एकाच्या अंगावरून, तर दुसऱ्याच्या पोटावरून वाहन गेल्याने दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले.
अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली. आज दोन्ही मृतांची ओळख पटली असून ते जळगाव येथील गोल्ड व्हॅल्यूअर व सोन्या-चांदीचे दागिने तयार करणारे कारागीर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दीपक भगवानदास वर्मा (रा. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यावर वाहन न थांबवता चालक पसार झाल्याने पोलिसांनी लगेचच नाकाबंदीसह तपास मोहीम सुरू केली.
जिल्ह्यात आणखी दोन अपघात
जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झाली आहे. धुळे मालेगाव महामार्गावरील शेरे पंजाब फॅमिली डाव्या समोरून जात असताना एचआर ५५३९ या क्रमांकाच्या कंटेनरने धडक दिल्याने भिला अशोक घोरपडे ( ५४, रा. आर्वी, ता. धुळे) यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ११ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेला हा अपघात झाला. याप्रकरणी विशाल भिला घोरपडे याने दिलेल्या फिर्यादीवरून अपघातग्रस्त कंटेनर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी घटना साक्री ते पिंपळनेर रस्त्यावरील प्लॅटिनियम शाळेच्या गतीरोधकापासून पुढे पिंपळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. ११ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेला झालेल्या या अपघातात एमएच ४१ एयु ५२२९ या क्रमांकाच्या मालमोटारीने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सौ. सरला देवराम सोनवणे ( ४८, रा. रामनगर मालपुर, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवराम हिरामण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालमोटार चालकाविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागरिकांचा रोष
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये महामार्गावरील वाढत्या अपघातांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. फागणे शिवारात वाहतूक नेहमीच वेगवान असल्याने वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी खूप पूर्वीपासून नागरिकांकडून सुरूच राहिल्या आहेत. दरम्यान, नागपूर – सुरत या चौपदरी महामार्गमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटत असताना घडणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनामुळे पुन्हा हा विषय चर्चेत येतो. यामुळे अशा अपघातप्रणव भागात अतिरिक्त पोलीस गस्त, वेग नियंत्रक उपाययोजना आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी स्थानिकांकडून पुढे येऊ लागली असून ज्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. दोन अनुभवी सोनार कारागिरांचा झालेला मृत्यू हा केवळ त्यांच्या कुटुंबांसाठीच नव्हे, तर दागिने व्यावसायिक वर्तुळासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
