जळगाव : भारतीय रेल्वेच्या स्थानकांची बरीच नावे स्थानिक परंपरा, त्या ठिकाणचे तीर्थक्षेत्रे, नद्या, पर्वत, ऐतिहासिक घटनांवरून ठेवण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, उत्तर प्रदेशातील एका रेल्वे स्थानकाच्या नावात चक्क जंगल उल्लेख दिसून येतो. या स्थानकाच्या नावातील जंगल शब्द पाहताच अनेकांच्या मनात दाट जंगल, वनराई आणि एखाद्या दुर्गम भागातील रेल्वे स्थानकाचे चित्र उभे राहते. प्रत्यक्षात, त्या स्थानकाच्या परिसरात नावाप्रमाणे जंगल कुठेच दिसत नाही. त्यामुळे प्रवासी आणखी कोड्यात पडतात.

गोरखपूर जिल्ह्यात वसलेले “नकहा जंगल” हे स्थानक उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांपैकी एका मार्गावर स्थित आहे. नकहा ही जुनी स्थानिक वस्ती असून त्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर दाट जंगल होते. त्यामुळे या भागातील रेल्वे स्थानकाला नकहा जंगल अशी ओळख मिळाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील तराई पट्टा हा नेपाळ सीमेलगतचा भाग असून तो पूर्वी मोठ्या प्रमाणावर जंगलांनी व्यापलेला होता. येथील सुपीक जमीन, नद्या, ओलसर हवामान आणि दाट वनराई यामुळे हा प्रदेश नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध मानला जात होता. अनेक दशकांपूर्वी या भागात वन्य जीवांचाही वावर मोठ्या प्रमाणावर असल्याच्या कथा स्थानिकांमध्ये आजही सांगितल्या जातात. नकहा जंगल हे स्थानक ईशान्य रेल्वेच्या अखत्यारीतील स्थानक असून स्थानिक आणि उपनगरी प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते.

गोरखपूर हे उत्तर भारतातील एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने या मार्गावरील अनेक प्रवाशांसाठी नकहा जंगल हे स्थानक दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. गोरखपूर, गोंडा, नौतनवा तसेच आसपासच्या ग्रामीण आणि उपनगरी भागांतील हजारो प्रवासी रोज या स्थानकाचा वापर करतात. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांसाठी हे स्थानक अत्यंत उपयुक्त ठरते. ग्रामीण भागातून शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा आरोग्य सेवांसाठी जाणाऱ्या नागरिकांना या स्थानकामुळे मोठी सुविधा मिळते. रेल्वे प्रवास हा तुलनेने स्वस्त आणि सोयीचा पर्याय असल्याने अनेक नागरिक आजही या स्थानकावर अवलंबून आहेत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, नकहा जंगल स्थानकावरून विविध पॅसेंजर आणि स्थानिक गाड्यांची वाहतूक सुरू असते. काही गाड्या गोरखपूरमार्गे पुढे बिहार आणि नेपाळ सीमेच्या दिशेनेही धावतात.

त्यामुळे नकहा जंगल हे स्थानक केवळ स्थानिक वाहतुकीपुरते मर्यादित नसून प्रादेशिक संपर्कासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या शहरांशी जोडण्यात या स्थानकाचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत समाज माध्यमांमुळे देशातील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. नकहा जंगल हे नाव त्यापैकीच एक ठरले आहे. अनेक युट्यूबर्स, रेल्वे ब्लॉगर्स आणि प्रवासी या स्थानकाला भेट देऊन त्याचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. काहींना या नावात साहसाची भावना जाणवते, तर काहींना ते एखाद्या चित्रपटातील ठिकाणासारखे वाटते. त्यामुळे या स्थानकाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

काळाच्या ओघात या भागात नागरीकरण झपाट्याने वाढल्याने जंगल कमी झाले असले, तरी रेल्वे स्थानकाच्या नावातील जंगल हा शब्द आजही त्या परिसराच्या ऐतिहासिक ओळखीची साक्ष देतो. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर झाडी, शेतीचा भूभाग होता. हळूहळू रस्ते, वसाहती आणि बाजारपेठा विकसित झाल्या. मात्र, स्थानकाचे नाव बदलले नाही आणि त्यामुळे जुन्या इतिहासाची आठवण आजही कायम राहिली आहे. रेल्वे अभ्यासकांच्या मते, अशा नावांमुळे त्या भागाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. नकहा जंगल रेल्वे स्थानक हे केवळ वाहतुकीचे साधन नसून त्याकडे स्थानिक इतिहास, भूगोल, संस्कृती आणि सामाजिक बदलांचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे.