कालव्याच्या पाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक : ज्यांच्या नावाचा समावेश काळ्या यादीत आहे आणि ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा लाभार्थ्यांना कालव्याचे पाणी दिले जाणार नाही, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ.रा.निकम यांनी दिली. पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील विविध तट कालव्यांच्या लाभक्षेत्रात प्रवाही आणि उपसा सिंचनाने पाणी घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी, पाणी वापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्याकरिता येत्या  १० नोव्हेंबरपर्यंत सिंचन शाखा कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

जिल्हातील वाकी, भाम, भावली, दारणा, मुकणे, वालदेवी, गंगापूर, कडवा, गौतमी, गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांचे जलाशय, नदी यावरून तसेच दारणा-गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० व कोल्हापूर बंधाऱ्याचे पाणी प्रवाही उपसा सिंचनाने पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या धरणक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमूना क्रमांक सात प्रवर्गात रब्बी हंगाम २०२१-२२  संरक्षित सिंचनाकरीता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार, फळबाग, बारमाही पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळा हंगाम अखेर पर्यंत पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून उर्वरीत पाण्याचा शेतीच्या पिकांसाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

ज्या कालव्यावर अथवा चारीवर नमूना सातची प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात सम प्रमाणात कपात करून मंजूरी देण्यात येणार आहे. सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना क्रमांक सात वर पाणी पुरवठा केला जाणार नाही.

उपलब्ध पाणीसाठ्यानुसार आवर्तन काळात कमी जास्त अंतराने पाणी पुरवठा झाल्याने पिकांचे काही कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले. मंजूर उपसा धारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा जल वाहिनीने पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.